उत्तर प्रदेशात उद्भवलेले जातीय दंगे हे ‘जाणीवपूर्वक घडविण्यात’ आलेले आहेत, या राहुल गांधी यांच्या विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्यावर सडकून टीका केली आहे, तर भाजप जातीयवादी राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून देशातील जातीय तेढ कायम राहण्यासाठीच हा पक्ष प्रयत्नशील असल्याची भावना वाढत चालली आहे. आपल्या राजकीय हेतूंसाठी भाजप धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करू पाहात आहे आणि हा त्याच धोरणाचा एक भाग आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केली.
उत्तर प्रदेशातही तेथील दुर्दैवी घटनांचा राजकीय लाभ उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. अशा वेळी धार्मिक अथवा जातीय आधारावर ध्रुवीकरण होणार नाही, याची काळजी घेणे हे सरकारचे काम आहे. मात्र केंद्राकडून अशी पावले उचलली जात नसल्याचे खेदानेच नमूद करावे लागेल, अशी जळजळीत टीका तिवारी यांनी केली.
भाजपचे प्रत्युत्तर
देशात धार्मिक किंवा जातीय आधारावर जर कोणी तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला असेल तर तो फक्त काँग्रेसनेच. त्यांनी मुस्लीम लीगशी आघाडी स्थापन केली. हैदराबादमध्येही त्यांनी एमआयएमशी जवळीक साधली होती. दोन्ही सदनांमध्ये जातीय तेढ वाढविण्याच्या मुद्दय़ाचे राजकारण हाच पक्ष करीत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानांचा आम्ही कडक शब्दांत निषेध करतो, असे भाजप नेते आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.