भाजपतर्फे पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा मोदींवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांच्या अलीकडेच झालेल्या एका बैठकीत अडवाणींनी पक्षाच्या निवडणूक प्रचारपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. भाजपचा निवडणूक प्रचार एकखांबी तंबूसारखा झाला असल्याच्या राहुल गांधी यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे वक्तव्य अडवाणींनी या बैठकीत केल्याचे समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राने हा गौप्यस्फोट केला आहे.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अडवाणी, मोदी व इतर ज्येष्ठ-वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीतच अडवाणींनी पक्षाच्या प्रचारपद्धतीवर टीका केली. पक्ष सध्या एकखांबी तंबू झाला असून एकाच व्यक्तीच्या बळावर पक्ष निवडणूक लढवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी २४ फेब्रुवारीच्या हरयाणातील जाहीर सभेत याबाबत केलेल्या टीकेशी आपण सहमत असल्याचे परखड मत अडवाणी यांनी या बैठकीत मांडले. मात्र, त्यांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करत बैठकीत निवडणूक प्रचाराची दिशा ठरवण्यात आली, तसेच उमेदवारांची पहिली यादीही तयार करण्यात आली.
मोदींचे मौन, इतरांची टीका
अडवाणींच्या या मुद्दय़ावर बैठकीत मात्र कोणीच काही बोलले नाही. नरेंद्र मोदींनी मौन बाळगले तर राजनाथ यांनी अडवाणींच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करत उमेदवारांच्या यादीचा विषय पुढे चालवला. मात्र, अडवाणींच्या या टीकेवरून पक्षात सार्वत्रिक नाराजी पसरली आहे. एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर अडवाणींची ही जुनीच खोड असल्याचे सांगितले. मोदींवर थेट किंवा आडून टीका करण्याचा अडवाणींचा हा पहिलाच प्रयत्न नाही, याआधीही त्यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच इष्ट ठरते असे या नेत्याने स्पष्ट केले.
पंतप्रधानपदासाठी मोदी यांच्या नावाची घोषणा करताच अडवाणी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी वारंवार मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे अडवाणींच्या टीकेकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही.
निवडणुकीचा प्रचार हा सांघिक असायला हवा. पक्षाच्या सर्वच नेत्यांनी प्रचारात उतरायला हवे. मात्र, सध्या फक्त मोदी आणि मोदीच असेच चित्र आहे. सुषमा स्वराज यांच्यासारखे नेतेही गर्दी खेचतात, त्यांच्या सभा का लावल्या जात नाहीत? राहुल गांधींनी हरयाणात मोदींच्या या एकखांबी तंबूछाप प्रचारावर केलेली टीका योग्यच आहे.
लालकृष्ण अडवाणी