वादग्रस्त वक्तव्याबद्दल अटक होण्याची शक्यता असलेले भाजपचे नेते गिरिराज सिंग हे गुरुवारी न्यायालयात शरण येणार आहेत, मात्र झारखंड की बिहारमधील न्यायालयात शरण येणार ते सिंग यांनी स्पष्ट केलेले नाही.
आपल्याला कायदा, निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेबद्दल आदर आहे, आपण गुरुवारी न्यायालयात शरण येणार आहोत. मात्र आपण कोठे शरणागती पत्करणार ते गिरिराज सिंग यांनी स्पष्ट केले नाही.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून गिरिराज सिंग यांच्याविरुद्ध देवगड येथे दोन, तर झारखंडमधील बोकारो येथे एक असे तीन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ज्यांचा विरोध असेल त्यांनी पाकिस्तानात जावे, असे वादग्रस्त वक्तव्य सिंग यांनी केले होते.मोदी यांनी गिरिराज यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यापूर्वी झारखंडमधील स्थानिक न्यायालयाने गिरिराज सिंग यांच्याविरुद्ध अटक वॉरण्ट जारी केले होते.