निवडणूक निकालांना आठवडय़ाचा अवधी असताना, भाजपने राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास नसल्याचे सांगत पाठिंब्यासाठी सर्व पक्षांचे पर्याय खुले असल्याचे सांगितले आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि मोदींचे विश्वासू अमित शहा यांनी व्यक्त केला.
देशाच्या विकासासाठी जर कोण आमच्याबरोबर आघाडी करत असेल तर स्वागत आहे, असे शहा यांनी सांगितले. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर भाजपचा राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास नाही, असे शहा यांनी सांगितले.  वाराणसीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांजल यादव यांच्या बदलीचा पुनरुच्चार शहा यांनी केला. निवडणूक आयोगाने आम्ही कुणाला घाबरत नाही, असे अप्रत्यक्षपणे भाजपला बजावले होते. त्यावर आम्हाला खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका हव्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. मोदींच्या सभेला परवानगी नाकारली जाते, मात्र शुक्रवारी केजरीवाल यांना तसेच शनिवारी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना कशाच्या आधारावर परवानगी दिली, असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची संधान बांधले असले तरी भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा दावा शहा यांनी केला. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. मोदी बडोदा आणि वाराणसीहून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यास बडोद्यातील जागेवर लढणार काय, असे विचारता शहा यांनी पक्षांतर्गत बाबींवर पत्रकार परिषदेत कशी चर्चा करणार, असे सांगत प्रतिक्रियेला नकार दिला.

भाजपला कदापि पाठिंबा नाही – मायावती
नवी दिल्ली:भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्धार बसपाच्या नेत्या मायावती यांनी व्यक्त केला आहे. एनडीएची स्थिती हलाखीची झाली असल्याची जाणीव झाल्यानेच नरेंद्र मोदी आता आपल्यासह जयललिता, ममता यांचा पाठिंबा घेणार असल्याचा दावा करीत आहेत, असेही मायावती यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशात २००३ मध्ये भाजप आपल्यासमवेत सत्तेत होते. बसपाचे सरकार अस्थिर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्नही केला, मात्र आपण ते सरकार वाचविल्याने भाजपला धक्का बसला, असेही मायावती म्हणाल्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे नेते मुलायमसिंग यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे ठरविले तरी बसपा त्यांना कोणत्याही स्थितीत पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाराणसीत मोदींच्या पुढे केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय या दोघांनाही भाजप तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून जमेस धरतच नाही.
– अमित शहा, भाजप नेते