भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारील स्थान नको आहे. आपल्याला दुसऱ्या रांगेतील स्थान मिळावे, अशी सूचना त्यांनी संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांना केली. मात्र नायडू यांनी अडवाणींना पहिल्याच रांगेत बसण्याची विनंती केली. अडवाणी लोकसभेच्या कामकाजात गुरुवारी पंतप्रधानांच्या शेजारी बसण्याऐवजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि रामविलास पासवान यांच्या रांगेत बसले होते. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला.
मिलिंद देवरा यांना धमकीचे पत्र
मुंबई:काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना खंडणीसाठी धमकावणारे पत्र पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद देवरा यांच्या कार्यालयात शुक्रवारी एक टपाल आले होते. हिंदीतून लिहिलेल्या या पत्रात देवरा यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हे पत्र राजस्थान येथून आले होते आणि ते हस्ताक्षरात लिहिले होते. पत्र लिहिणाऱ्याने रिपुसदन सिंग असे नाव लिहून राजस्थानचा पत्ता दिला होता. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हस्ताक्षर तपासून कुणी खोडसाळपणा केला आहे का त्याचा शोध घेत आहेत.

१६
सुमित्रा महाजन या लोकसभेच्या १६व्या अध्यक्ष असतील . भाजपला हे पद पहिल्यांदा मिळत आहे. यापूर्वी भाजपने एनडीएमधील पक्षांना हा सन्मान दिला होता. तेलुगू देशमचे जी.एम.सी. बालयोगी आणि शिवसेनेचे मनोहर जोशी अध्यक्ष होते.

काँग्रेसबरोबर आघाडी कायम
लोकसभा निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी राष्ट्रीय जनता दलाची काँग्रेसबरोबर बिहारमध्ये आघाडी कायम राहील. या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांशी आपण चर्चा केली आहे. त्यामुळे कोण काय म्हणतो हे मला माहीत नाही. काँग्रेसकडून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे काही लोक पराभवाचे खापर आमच्या आघाडीवर फोडत आहेत. संयुक्त जनता दलापेक्षा आमची कामगिरी चांगली झाली आहे.
-लालूप्रसाद यादव, राजद अध्यक्ष

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. त्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या हल्ल्यांबाबत आमच्याकडे विचारणा केली आणि चिंता व्यक्त केली. आम्ही त्यांना परिस्थितीची माहिती दिली. याबाबत राज्यपालांना आम्ही निवदेन दिले आहे.त्यांना राज्यातील स्थितीबाबत कल्पना दिली आहे. त्यामुळे आता ते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना याबाबत माहिती देतील, अशी शक्यता आहे.     
-राहुल सिन्हा, भाजप नेते