उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये तणावाची स्थिती निर्माण होण्यास भाजप कारणीभूत असल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसने केला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कारवाई करण्यावाचून राज्यातील सपा सरकारपुढे अन्य पर्याय नव्हता, असे स्पष्ट करून काँग्रेसने सपाचीही पाठराखण केली.
सत्तारूढ भाजप फुटीरतेचे राजकारण करीत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी संगीत सोम यांनी या परिसरात महापंचायत घेण्याच्या निर्णयावर सिंघवी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ निवडणुकीच्या हेतूनेच सोम अशी कृती करीत आहेत, असा आरोपही सिंघवी यांनी केला आहे.
महापंचायत आयोजित केल्याविना देशाचा कारभार चालू शकत नाही का, हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे, यावरून भाजपचा फुटीरतावादी कार्यक्रम स्पष्ट होत आहे, मोदी मौन पाळून बसले आहेत आणि भाजपचा कोणताही ज्येष्ठ नेता त्याचा साधा निषेधही करीत नाही, केवळ राजकीय उद्दिष्टासाठीच सोम यांचा हा खटाटोप आहे, असेही सिंघवी यांनी म्हटले आहे.
स्थिती नियंत्रणाखाली
महापंचायत आयोजित करण्यावरून कंठ परिसरात हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने तेथे तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सध्या येथील परिस्थिती शांत असली तरी  तणाव कायम आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे मोरादाबादचे आयुक्त शिवशंकर सिंग यांनी सांगितले.