केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येणार आणि महाराष्ट्रातही महायुतीला घवघवीत यश मिळणार, अशी खात्री वाटत असल्याने भाजपने मुंबईत सर्वत्र जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. नरीमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालय विद्युत रोषणाईने झळाळून उठले आहे. शहरात अनेक ठिकाणी शेकडो किलो मिठाई, हजारो लाडूंचे वाटप करून विजयोत्सव साजरा केला जाणार असून फटाक्यांची आतषबाजीही होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश कार्यालयात काही नेत्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदेश कार्यालयापुढे जल्लोषाची तयारीही करण्यात येत आहे. नेत्यांचे कटआऊट्स, बॅनर्स लावण्यात येत आहेत. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये, अशी पोलिसांनी केलेली विनंती भाजप नेत्यांनी धुडकावून लावली आहे. कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येऊन जल्लोष साजरा करणार असून फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. प्रदेश कार्यालयापुढे नेत्यांचे कटआऊट्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. प्रदेश कार्यालयापुढे मोठय़ा पडद्यावर निकालाची माहिती खासगी वाहिन्यांवरील प्रसारणाद्वारे दाखविली जाणार आहे. महायुतीच्या उमेदवारांचा विजय दिसू लागताच जल्लोष व मिठाई वाटप सुरू होईल. ढोलताशे व गुलालाची उधळण होणार आहे. भाजप प्रवक्ते अतुल शहा यांनी बुंदीचे सुमारे ४५ हजार लाडू आणि काजू कतली, मालपुवासह दोन हजार किलो मिठाई वाटपाचे नियोजन केले आहे. सीपी टँक, नागपाडा यासह काही भागात निकालाचे प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. राज पुरोहित हे मुंबादेवी परिसरात सुमारे ४०० किलो मिठाईचे वाटप करणार आहेत. भाजप उमेदवारांनीही मिठाई वाटपाची तयारी केली आहे.
मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून मुंबईत विजयी मिरवणुकांचीही तयारी सुरु आहे.
गुजराती बांधवांचा आनंद द्विगुणित..
गेले काही दिवस ‘अब की बार मोदी सरकार..’ असा प्रचार करणाऱ्या गुजराती बांधवांचा उत्साह लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला द्विगुणीत झाला आहे. मुंबईतील ठिकठिकाणच्या गुजराती बांधवांच्या वस्त्यांमध्ये गुरुवारी सायंकाळपासूनच जल्लोषाची तयारी जोमाने सुरू झाली होती. सारा परिसर ‘मोदीमय’ झाला होता. काही परिसर रोषणाईत उजळून निघाले आणि ‘काले आवजो’चा सूर निकालाच्या उत्सवाच्या तयारीत भर घालत होता.