शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याचा नारा ठोकला जात असला तरी, कसोटीच्या वेळी मात्र महायुतीत आपापला अजेंडा राबविला जातो. महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या साताऱ्याच्या एकुलत्या एक जागेवर रामदास आठवले यांनी मराठा समाजातील कार्यकर्ते संभाजी सकपाळ यांना उमेदवारी दिली, पण  शिवसेना व भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत भीमशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध समाजातील एकाही कार्यकर्त्यांला स्थान मिळालेले नाही.
लोकसभा निवडणुकीततीन जागा मागणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला फक्त सातारा ही एकच जागा देऊन भाजप-शिवसेनेने त्यांची बोळवण केली. अर्थात भाजपने राज्यसभेची खासदारकी दिल्यामुळे आठवले यांना लोकसभेच्या जास्ती जागा मागण्याचा आवाजच बंद झाला आहे. भाजपने आठवले यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यामुळे शिवसेनेच्या कोटय़ातून लोकसभेची जागा घ्या, असे रिपाइंला सांगण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेने अडचणीची ठरलेला सातारा मतदारसंघ रिपाइंला देऊन टाकला. परंतु त्याबद्दल रिपाइं नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्यानंतर सेनेने उमेदवार निवडीत हस्तक्षेप करण्याचे सोडून दिले.  पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आठवले यांनी सातारा मतदारसंघासाठी पक्षाच्या मराठा आघाडीचे उपाध्यक्ष असलेले संभाजी सकपाळ यांचे नाव निश्चित केले. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भीमशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यां ला स्थान मिळालेले नाही. रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा सुरु आहे.