गुजरात दंगलीसाठी शंभरदा माफी मागितली तरी भारतीय जनता पक्षाला क्षमा करणार नाही, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. भ्रष्टाचारात काँग्रेसचा हात कुणीही धरू शकणार नाही, असे सांगत मायावती यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप वा काँग्रेसशी युती करणार नसल्याचे संकेत दिले. पत्रकार परिषदेत मायावती यांनी केंद्रातील सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्षासह समाजवादी पक्षावरही
हल्लाबोल केला.
मायावती म्हणाल्या की, अल्पसंख्याक समुदायातील शेकडो निरपराधांची गुजरातमध्ये कत्तल झाली. समाजवादी पक्षाचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या दंगलीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. जातीय दंगलीचा उल्लेख आल्यावर नरेंद्र मोदी व मुलायमसिंह यादव सारखेच आहेत. दोन्ही नेत्यांच्या राजवटीत अल्पसंख्याक समाज असुरक्षित आहे. मायावतींच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप-बसप युतीची शक्यता संपुष्टात आली आहे. भाजप म्हणजे ‘बहोत ज्यादा पाप’ अशी नवी व्याख्या करीत मायावती यांनी मोदींवर तोंडसुख घेतले. जो पतिधर्म निभावू शकत नाही तो राष्ट्रधर्म काय निभावणार, असा प्रश्न उपस्थित करून मायावती यांनी मोदींच्या बालविवाहावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्या म्हणाल्या की, मोदी स्वत:ला मागासवर्गीय म्हणवतात. परंतु त्यांनी कधीही स्वत:ची जात सांगितली नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी सरकारचे प्रतिनिधित्व करतात असा आरोप मायावती यांनी केला.