काँग्रेसची धूळधाण करून सत्ता हस्तगत करणारे देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीनंतर विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाच्या तांत्रिक प्रशिक्षणास सर्वाधिक महत्त्व देणार आहे. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यात येणारी चाचपणी नरेंद्र मोदींनी सुरू केली आहे. विजयोत्सवाचा जोश ओसरल्यानंतर नूतन सरकारचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या सहा महिन्यांतच रेल्वे विद्यापीठाची स्थापना करण्याची योजना मोदींनी आखल्याचा दावा अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी केला. मात्र, आघाडय़ांच्या राजकारणात रेल्वे मंत्रालय नेहमीच सहकारी पक्षांकडे देण्याचा जणू नियमच बनला. परंतु महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी मोदी रेल्वे मंत्रालय भाजपकडेच ठेवणार असल्याचे समजते.
रेल्वेशी संबंधित सर्व तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण या विद्यापीठातून दिले जाईल. त्यामुळे रेल्वेत थेट तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची भरती करता येईल. रेल्वेव्यतिरिक्त देशातील प्रमुख शहरांना जोडणारी बुलेट ट्रेन सुरू करण्यात येईल. यासाठी रेल्वे अंतर्गत स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येईल. नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर रेल्वेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे.
आघाडय़ांच्या राजकारणामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रिपद नेहमीच सहकारी पक्षाकडे दिले जाते. आता मात्र जादूई आकडा गाठल्याने भाजपचा भाव वधारला आहे. मोदींच्या हाती सत्तेची दोरी असल्याने रेल्वे मंत्रीदेखील त्यांच्याच पसंतीच्या अर्थात भाजपच्याच नेत्याला दिले जाईल. दरम्यान, भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असला तरी रालोआतील सहकारी पक्षांचे महत्त्व अबाधित राखले जाईल, अशी ग्वाही राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. ते म्हणाले की, सर्वाना समान न्यायाने मंत्रिमंडळाचे वाटप केले जाईल. भाजपचे प्रमुख सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल व शिवसेना यांना अनुक्रमे दोन व चार राज्य मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदासाठी मात्र सहकारी पक्षांचा विचार केला जाणार नसल्याची शक्यता आहे. छोटेखानी मंत्रिमंडळामुळे नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.