दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही ‘शतप्रतिशत’ सत्ता काबीज करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना नवी दिल्लीत मंत्रिपदी पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरूण आणि आक्रमक चेहरा राज्यात नेतृत्व करण्यासाठी पुढे आणण्याचा विचार भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळात सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी या संकल्पनेवर मान्यतेची मोहोर उठविल्यावर तशी पावले टाकण्यात येतील.
देशात घवघवीत यश मिळाल्यावर महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हटविण्यासाठी आता ‘धक्कातंत्र’ अवलंबिण्यासाठी पावले टाकण्याचा भाजपचा विचार आहे. भाजपची ताकद राज्यातही चांगलीच वाढली असून त्याचा पुरेपूर फायदा करण्याचा केंद्रीय नेतृत्वाकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील नावे ठरवितानाच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन कोणती राजकीय समीकरणे मांडायची, यावर खल सुरू आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना तातडीने नवी दिल्लीला पाचारण करण्यात आले असून मोदी आणि अमित शहा हे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांचे गट दीर्घकाळ कार्यरत आहेत. त्यांच्यातील वाद न मिटल्याने आतापर्यंत भाजपचे नुकसान झाले व सत्ता मिळू शकली नाही. यावेळी गटबाजी उखडून काढण्यासाठी पावले टाकली जाणार आहेत. गडकरी आणि मुंडे हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांना मंत्रिपद दिले जाईल. मुंडे यांना मंत्रिपद दिल्यावर राज्यातील निवडणुकीची सर्व सूत्रे त्यांना दिली जाण्याची शक्यता कमी आहे. ज्येष्ठ नेत्यांचा उमेदवार ठरविणे, राजकीय समीकरणे तयार करणे आणि प्रचार या कामांमध्ये सहभाग ठेवावा, पण कोणत्याही एका नेत्याकडे पूर्ण सूत्रे देऊ नयेत, असे मत केंद्रीय नेतृत्वाकडे मांडण्यात आले आहे.  
अमित शहा यांनी उत्तरप्रदेशात ठाण मांडून जी कामगिरी घडविली, ती महाराष्ट्रातही घडविण्यासाठी त्यांच्यावर येथील जबाबदारी टाकण्यात यावी, असे प्रदेश नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपची ताकद वाढलेली असताना जागावाटपात अधिक जागा शिवसेनेकडून मिळविण्याची कामगिरी फडणवीस यशस्वीपणे पार पाडतील आणि शिवसेनेला राज्यात तोंड देत मुख्यमंत्रीपदही भाजपकडे खेचतील, अशी अपेक्षा केंद्रीय नेतृत्वाला
वाटत आहे.