अमेठीतील प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सत्तेत आल्यास विकास करण्याचे भाजपचे हेतू स्वच्छ नाहीत, असा आरोप त्यांनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ज्या कल्याणकारी योजना आणल्या त्या रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.
अन्न सुरक्षा, रोजगार हमी योजना रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आपली माहिती असल्याचा आरोपही राहुल यांनी येथील प्रचारसभेत केला. मोदींचे विकासाचे प्रारूप केवळ एक-दोन उद्योगपतींपुरतेच मर्यादित आहे. गुजरातमध्ये ज्या शेतकऱ्यांनी उद्योगपतींना जमिनी दिल्या त्यांच्यावर राज्याबाहेर जाण्याची वेळ आल्याचा आरोपही राहुल यांनी केला. शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज काँग्रेस सरकारने माफ केल्याची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेसने महिलांना सन्मान दिला. भारतीय महिला सक्षम आहेत हे मोदींनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी पाळत प्रकरणाचा संदर्भ देत मोदींवर हल्ला चढवला.