भाजप महिलांबाबत केवळ वाचाळवीराचीच भूमिका बजावत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत तावातावाने बोलणाऱ्या भाजपच्या निवडणूक पोस्टर्सवर मात्र नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र आहे, असेही गांधी म्हणाले.
भाजप महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाता मारते, मात्र दिल्लीत त्या पक्षाच्या पोस्टर्सवर केवळ एकाच व्यक्तीचे छायाचित्र आहे. सुषमा स्वराज अथवा भाजपमधील अन्य महिला नेत्यांचे छायाचित्र नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
गुजरातमध्ये संपूर्ण पोलीस दल आणि गुप्तचर यंत्रणा महिलांवर पाळत ठेवण्यात व्यस्त आहे. या वेळी सत्तेत आल्यास सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयक विधानसभा आणि संसदेत मंजूर करून घेतले जाईल. सत्तेत आल्यास महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात २००० पोलीस ठाणी सुरू करण्यात येतील आणि पोलीस दलात महिलांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.