लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीत राजकारणाचाच खेळखंडोबा झाला आहे. काही गट काँग्रेसबरोबर, कुणी राष्ट्रवादीसोबत, काहींची शिवसेना-भाजपशी सोयरिक, काहींनी कुणाशी जमले नाही म्हणून स्वबळावर लढण्याची दिलेली हाक, तर काहींनी दुरून राजकारण साजरे म्हणत चक्क नकारात्मक मतदान करण्याची गर्जना केली. आता विविध गटाधिपतींच्या सोयीच्या सोयरिकीनुसार त्यांचे अनुयायी म्हणजे आंबेडकरी कार्यकर्ते आता, भगवे आणि तिरंगी झेंडय़ांचे ओझे वागवत प्रचार करायला लागतील. इतर पक्षांच्या झेंडय़ांच्या गर्दीत मात्र निळा झेंडा गुदमरून जाणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन राजकारणाची एकच तऱ्हा. कुणाच्या तरी आश्रयानेच निवडणुका लढविण्याचा रिपब्लिकन नेतृत्वाचा आटापिटा असतो. या वेळी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन गटांची इतर प्रस्थापित पक्षांशी युती करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यानुसार रामदास आठवले यांच्या गटाने शिवसेना-भाजपबरोबर आधीपासूनच युती केली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निळ्याबरोबर भगवा झेंडाही खांद्यावर घेतला आहे. त्यांच्या पक्षाला सातारा ही एकच जागा देण्यात आली आहे. या एका मतदारसंघाचा अपवाद वगळला तर, आठवले यांचे कार्यकर्ते भगव्या झेंडय़ाचे ओझे घेऊन इतर ४७ मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील.
काँग्रेसबरोबर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आघाडी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी तशी घोषणा करण्यात आली. त्यांच्याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या सुलेखा कुंभारे व डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस समाधान नावकर या नेत्यांनी काँग्रेसशी युती केली आहे. काँग्रेसने त्यांना एकही जागा दिली नाही. हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचा झेंडा घेऊन प्रचार करतील. माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आणि पँथर रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या खांद्यावर आता राष्ट्रवादीचा झेंडा असेल.  
राजकारणात थेट उतरायचे नाही, परंतु राजकारण तर करायचे, अशा भूमिकेत असलेल्या रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी, तर नकारात्मक मतदान करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. रिपब्लिकन सेना, निवडणुकीत नसणार, प्रचारात नसणार, त्यामुळे तिथेही निळा झेंडाही नसेल.