कानडी पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलेल्या येळ्ळूर गावातील मराठी बांधवांवरील बेगडी प्रेमाचे दर्शन शिवसेनेने बुधवारी महापालिकेत घडविले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना हवे ते कामकाज आटोपून येळ्ळूरमध्ये मराठी बांधवांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत शिवसेनेने स्थायी समितीची बैठक तहकूब केली. मात्र कामकाज करण्यापूर्वीच बैठक तहकूब करायला हवी होती, असा मुद्दा उपस्थित करीत विरोधकांनी कानडी पोलीस आणि शिवसेनेचा निषेध केला आणि तहकुबीच्या मागणीस पाठिंबा दिला.
येळ्ळूरमधील पोलिसी अत्याचाराला दहा दिवस उलटल्यानंतर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना या घटनेची जाणीव झाली आणि त्यांनी बुधवारच्या स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे ही घटना कथन केली. मात्र कामकाज न करताच बैठक तहकूब करण्यात आली असती तर त्याचे गांभीर्य राहिले असते. परंतु कामकाज पूर्ण झाल्यानंतर बैठक तहकूब करून या विषयाचे गांभीर्य शिवसेनेने घालविले आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला. येळ्ळूरमध्ये मराठी माणसावर अन्याय होत असताना केंद्र सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने निषेध करीत सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हान मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केले.