मुंबई ही ‘पेड न्यूज’ची राजधानी आहे, असे वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी केल्याने प्रसिद्धी माध्यमांच्या नाराज प्रतिनिधींनी आज त्यांना धारेवर धरीत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर ब्रह्मा आणि मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि प्रसिद्धी माध्यमांना दोषी ठरविण्याचा हेतू नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीतील पैशांचा अर्निबध वापर रोखण्याची मागणी व तक्रारीही काही लहान पक्ष व उमेदवारांनी केल्या आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त संपत, निवडणूक आयुक्त नसीम झैदी व ब्रह्मा यांनी शुक्रवारी मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला व संबंधितांशी चर्चा केली. निवडणुकीत पैशांचा अर्निबध वापर होण्याची शक्यता असून तो रोखण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. त्याचा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या ‘पेड न्यूज’च्या तक्रारींचा उल्लेख आयुक्तांनी केला. मुंबईत पैशाची ताकद मोठी असून प्रसिद्धी माध्यमांनी आयोगाला सहकार्य करावे आणि पेड न्यूजला बळी पडू नये, असे आवाहन आयुक्त ब्रह्मा यांनी केले. महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात आणि चांगले ‘तगडे’ खासदार निवडून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
ब्रह्मा यांनी मुंबईचा उल्लेख वारंवार ‘बाँबे’ असा करून ‘पेड न्यूज’ची राजधानी असे वक्तव्य केल्याने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करीत प्रश्नांच्या फैरी झाडल्या. हे ब्रह्मा यांचे वैयक्तिक मत आहे, की संपूर्ण आयोगाचे मत किंवा निष्कर्ष आहे, अशी विचारणाही करण्यात आली. त्यावर प्रसिद्धी माध्यमांच्या भावना दुखावण्याचा िंकंवा त्यांना दोषी ठरविण्याचा उद्देश नव्हता, अशी सारवासारव मुख्य निवडणूक आयुक्त संपत व ब्रह्मा यांनी केली. केवळ काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या. प्रसिद्धी माध्यमे सर्व उमेदवारांना समान न्याय देऊन प्रसिद्धी देत नाहीत, लहान पक्ष व उमेदवारांना अजिबात प्रसिद्धी मिळत नाही. आयोगाने प्रसिद्धी माध्यमांना सूचना द्याव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे हा उल्लेख केल्याचे आणि आयोगाकडे आलेल्या पेड न्यूजच्या तक्रारींपैकी काही महाराष्ट्रातील होत्या, त्यामुळे हे वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण आयुक्त ब्रह्मा यांनी दिले.
प्रेस कौन्सिल व निवडणूक आयोगाचीही प्रसिद्धी माध्यमांसाठी नियमावली असून निवडणूक खर्चाची मर्यादा काटेकोरपणे पाळली जाईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी सहकार्य करून गैरवापर व अयोग्य बाबी निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन आयुक्तांनी केले.