पक्षाचा पाया अधिक विस्तारण्यासाठी भाजपने राज्यात ब्राह्मणेतर नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे आणले. बहुजन समाजाला संधी दिली होती. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षपदा पाठोपाठ नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देऊन ब्राह्मण नेत्यांचे महत्त्व वाढविले आहे.
प्रमोद महाजन यांच्याकडे राज्यातील भाजपची सारी सूत्रे होती. पक्षाचा पाया अधिक विस्तृत करण्याकरिता अन्य समाजाला बरोबर घेण्यावर महाजन यांनी भर दिला. त्यातूनच आपले मेव्हणे मुंडे यांच्यावर सारी जबाबदारी सोपविली. मुंडे यांनी मग महाजन यांच्या मदतीने राज्यात भाजपची ताकद वाढविली. मुंडे यांनी सर्व समाज घटकांना बरोबर आणले.
गेल्या वर्षी सुधीर मुनगंटीवार यांच्याऐवजी राज्य भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका या भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना करताना राज्य विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवण्यात आली. गडकरी आणि जावडेकर या ब्राह्मण, मुंडे ओ.बी.सी, मराठा समाजाताली दानवे आणि गुजराथी-मारवाडी-जैन समाजाचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता पियुष गोयल यांना संधी देण्यात आली.
एकनाथ खडसे यांच्याकडे विधानसभेतील तर विनोद तावडे यांच्याकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोपावून पक्षाने मराठा आणि इतर मागासवर्गीय असा समतोल साधला आहे. मुंबईचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे आहे. मात्र फडणवीस यांच्यासह गडकरी आणि जावडेकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपाविल्याने पक्षात ब्राह्मण समाजाच्या नेत्यांचे प्रस्थ वाढले आहे.