लोकसभा निवडणुकीत संबंध देशभर आणि खास करुन उत्तर प्रदेशात दारुण पराभवाचा तडाखा बसल्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेली अनेक वर्षे दक्षिणेतील राज्यांची धुरा संभाळणारे डॉ. सुरेश माने यांच्यावर राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्या राज्यातील बसपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मायावती यांचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातच बसपला मोठा हादरा बसला.पक्षाच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी मायावती यांनी २० मे रोजी लखनऊमध्ये बैठक झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.  विधानसभा निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्याबरोबरच बसपमधील एक थिंक टॅंक म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुरेश माने यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.