विधान परिषदेच्या आमदारकीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याबाबतची सीडी प्रसारित करण्यात आल्याने आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा संबंध असल्याचे उघड झाल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच केंद्र सरकारने याबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागविला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी येथे सांगितले. राज्य सरकार आपला अहवाल आणि त्यावर करण्यात आलेली कारवाईची माहिती मंगळवारी अथवा बुधवापर्यंत केंद्र सरकारकडे पाठवेल, असे सिद्धरामय्या यांनी वार्ताहरांना सांगितले.
जद(एस)चे आमदार बिजापूरचे जदचेच(एस) नेते विजूगौडा पाटील यांना मत देण्यासाठी पैशांची मागणी करीत आहेत, असे कुमारस्वामी विजूगौडा पाटील यांच्या समर्थकांना सांगत असल्याची सीडी प्रसारित झाल्याने कर्नाटकमध्ये राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. पक्षाचे ४० आमदार असून प्रत्येक जण प्रत्येकी एक कोटी रुपयांची मागणी करीत आहे, असेही कुमारस्वामी सांगताना सीडीमधून स्पष्ट होत आहे.