केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी येत्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र त्याचवेळी त्यांचे चिरंजीव कार्ती यांना काँग्रेस पक्षाने तामिळनाडूमधील चिदम्बरम् यांच्याच सिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
गुरुवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या नव्या यादीत नैऋत्य दिल्ली आणि दक्षिण दिल्ली मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली.  काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांचे बंधू लक्ष्मण यांना सुषमा स्वराज यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील विदीशा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.