गुजरात राज्याच्या विकासाबद्दल अतिशयोक्ती करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारासाठी कोट्यावधी रुपये कुठून आणले? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. ते वडोदरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मधुसूदन मेस्त्री यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
चिदंबरम म्हणतात, “बढाईखोर भूमिका ठेवून राज्याचा विकास झाल्याची अतिशयोक्ती गुजरात सरकाने केली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खोटे बोलण्यात तरबेज आहेत. मूळात गुजरातमध्ये अपेक्षित प्रगती झालेलीच नाही. चेन्नईत झालेल्या मोदींच्या एका जाहीरसभेचा खर्च २० कोटींच्या घरात गेल्याचे मी ऐकले आहे आणि देशभरात मोदींच्या एकूण ४०० सभा होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. जर आतापर्यंत त्यातील २०० सभा जरी झाल्या असतील आणि एका सभेचा खर्च ५ ते १० कोटी जरी गृहीत धरला तरी पक्षाला एकूण २००० कोटींचा खर्च करावा लागला. मग, भाजपने हे २००० कोटी आणले कोठून याची सविस्तर माहिती द्यावी. खर्च करण्यात आलेला पैसा काळा होता किंवा नव्हता यातील काहीच मला माहित नाही परंतु, हा पैसा पक्षाचा नसून दुसऱया कोणाचा असण्याची दाट शक्यता आहे.” असेही चिदंबरम म्हणाले.
मोदींच्या गुजरात विकासावर टीका करताना चिदंबरम म्हणतात, “विकासाच्या सर्व दाव्यांचे आम्ही स्वागत करू परंतु, त्याची अतिशयोक्ती करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणे योग्य नाही. जाहिरातबाजीत अतिरंजित प्रशंसा करून वास्तवापेक्षा अवाढव्य प्रगती मांडण्याचे कृत्य भाजप करत आहे.” असेही ते म्हणाले.