भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येत्या लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी वाराणसीनंतरचा दुसरा सुरक्षित मतदारसंघ म्हणून निवडलेल्या गुजरातमधील वडोदरा या मतदारसंघात काँग्रेसने अगदीच नवखा उमेदवार दिल्यामुळे येथील सामना नवे आणि जुन्यांमधला असणार आह़े  भाजपचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून मोदी मोठय़ा फरकाने निवडून येतील, असा पक्षाचा दावा आह़े
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात आणलेल्या नव्या पद्धतीनुसार, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत घेण्यात आल्यानंतर काँग्रेसने पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आह़े  रावत हे पेशाने अभियंता असून ते महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे सिनेट सदस्यही आहेत़  त्यांनी आजवर कोणतीही निवडणूक लढविलेली नाही़  त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आह़े
हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आह़े  २००९ च्या निवडणुकीतही येथून भाजपचे उमेदवार बाळू शुक्ला यांनी १.३६ लाख मताधिक्याने विजय मिळविला होता़  परंतु आपण या शहरासाठी गेली वीस वष्रे काम करीत असून मोदींना टक्कर देण्याची मला मुळीच भीती वाटत नाही, असे काँग्रेसचे उमेदवार रावत यांनी म्हटले.