देशात राजकीय परिवर्तन घडवायला आणि राजकीय पर्याय द्यायला निघालेल्या आम आदमी पक्षातही सध्या कुरबूर सुरू झाली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या आपच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून खडाखडी झाली. त्याचा ताण अस’ा झाल्याने आपच्या सचिव प्रीती शर्मा यांना रडूच कोसळले. मात्र नंतर हा वाद मिटविण्यात आला.
आपने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांनी प्रचार कसा करावा, आचारसंहिता कशी पाळावी, निवडणुकीसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे यासाठी मुंबईतील पक्ष कार्यालयात दोन दिवस खास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात सर्व उमेदवार आणि माहिती तंत्रज्ञान, निधी संकलन, विधी व माध्यम समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
बुधवारी प्रशिक्षणानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काही जणांच्या कार्यपद्धतीवरून, कार्यशैलीवरून खडाखडी झाली. काही पदाधिकाऱ्यांवर ताण येत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. त्यावरूनही वादविवाद झडला. त्यामुळे पक्षाच्या सचिव प्रीती शर्मा यांना रडू कोसळले. परंतु लगेच सर्वच पदाधिकाऱ्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेत, अंतर्गत वादावर पडदा टाकला. या संदर्भात पक्षाचे नेते मयांक गांधी यांच्याशी संपर्क साधला असता, काही किरकोळ वादाचे मुद्दे होते, अशी कबुली त्यांनी दिली. परंतु पक्षात फार मोठा वाद नाही, असे त्यांनी सांगितले.