राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे खापर केंद्रातील काँग्रेस सरकारवर फोडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोकळे झाले असले तरी, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारभाराबाबतही आनंदीआनंदच असून, आघाडीच्या पराभवास आघाडी सरकारची खराब प्रतिमाही तेवढीच जबाबदार असल्याचे काँग्रेसमध्येच बोलले जात आहे.
काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्याने मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात मोहिम सुरू झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पक्षातून जोर धरू लागली असली तरी सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता दिसत नाही. दिल्लीचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्र्यांनी पराभवाबद्दल स्वत:चा कातडी बचाव करताना सारे केंद्रातील काँग्रेस सरकारवर ढकलले. यासाठी विदर्भातील रिसोड मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीचे उदाहरण दिले.
कारण या मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला असला तरी त्याच वेळी अकोला मतदारसंघात याच रिसोडमध्ये भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती याकडे लक्ष वेधले. विधानसभेसाठी काँग्रेसला मिळालेला विजय हा राज्य सरकारच्या कामगिरीवर शिक्कमोर्तब असल्याचा दाखला मुख्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक माजी मंत्री सुभाष झनक यांच्या निधनाची सहानभुती त्यांच्या मुलाला मिळाली आणि तो विजयी झाला, असे काँग्रेस नेत्यांचे विश्लेषण आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारवरील राग, भ्रष्टाचार आणि त्यातून वाढलेली महागाई तसेच मतांचे धार्मिकदृष्टया झालेले ध्रुवीकरण हे राज्यातील काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पराभवाचे सारे खापर केंद्रातील काँग्रेस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला.  
विधानसभाजिंकण्याकरिता राज्य सरकारला लोकोपयोगी निर्णय तात्काळ घ्यावे लागतील, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारीच मुख्यमंत्री चव्हाण यांना दिला. आघाडी सरकारच्या कारभाराबाबतही जनतेमध्ये तेवढी चांगली प्रतिमा नाही. केंद्रातील यूपीए सरकारला भ्रष्टाचार, मंत्र्यांवर झालेले आरोप याचा फटका बसला. महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही याकडेही लक्ष वेधले जाते.

मात्र, गेली साडेतीन वर्षे वगळता पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात व तेही पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. तरीही याचे सारे खापर केंद्रातील काँग्रेस सरकावर फोडणे म्हणजे स्वत:च्या अंगावर शेकू नये हाच प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका मंत्र्याने व्यक्त केली.