मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या समारंभासाठी कोल्हापुरात आलेले हे दोन्ही नेते शेजारी बसूनही एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत, पण या कार्यक्रमात बोलताना दोघांनीही मराठा आरक्षणाचे श्रेय एकमेकाला देत स्तुतिसुमने उधळली.
मराठा महासंघाच्या अधिवेशनानिमित्ताने मुख्यमंत्री चव्हाण, राणे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सतेज पाटील आदी नेते रविवारी एका व्यासपीठावर होते. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री, राणे यांचा आणि पाठिंबा दिल्याबद्दल तावडे यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात राणे व मुख्यमंत्री एकमेकांशेजारीच बसले होते. पण बराच काळ त्यांनी एकमेकांकडे पाहण्याचेही टाळले. मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना राणे यांनी टाळ्या वाजविल्या, पण राणे यांचा सत्कार सुरू असताना मुख्यमंत्री मागे सरकले.
मुख्यमंत्री चव्हाण आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर उघड टीका करणारे राणे या कार्यक्रमातही चव्हाणांवर तोफ डागणार का, अशी उत्सुकता होती. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद दिल्याबद्दल राणे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ‘मी तर केवळ निमित्तमात्र, यशाचा धनी मी नाही. त्यांच्यामुळेच मराठा समाजासाठी मी काही करू शकलो,’ अशी स्तुतिसुमने राणे यांनी उधळली. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही त्यांच्या भाषणात राणेंच्या कामाची प्रशंसा केली. ‘राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल देण्याची जबाबदारी दिल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे काम केले,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘हवे ते मिळवतो’
काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे मंगळवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर रविवारच्या भाषणात बोलताना राणे यांनी आपल्या राजकीय नाराजीचा उल्लेख केला नाही. मात्र, ‘खऱ्या मराठय़ाचे रक्त नेहमी सळसळते. तो अर्ज, विनंती करीत बसत नाही, तो हवे ते मिळवितो,’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.