सध्याच्या प्रचाराच्या धबडग्यात उसंत अशी मिळतच नाही़  त्यामुळे  गडबडीत, खाणंपिणं, जेवणच वेळेवर होत नाही, मग आहाराचं नियोजनबियोजन अवघडच.. कधीतरी संध्याकाळीच भूक लागलेली असते. एखादी सभा संपल्यावर कुणाच्या घरी समोसा, कचोरीची प्लेट समोर येते, आणि पथ्यपाण्याचा विचार न करता आपण ती उचलतो.. खाण्याचे दर्दी असूनही, मुंबईतील नावाजलेल्या हॉटेलांमध्ये जाणं अलीकडे पदामुळे अवघड झालंय, मग सहाजिकच, आवडीही गुंडाळाव्या लागतात.. विमानात बसल्यावर लगेचच सुरू झालेल्या, इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये हे सारं सहजपणे व्यक्त करत मुख्यमंत्री स्वतला जणू आणखी मोकळं करत असतात..
‘एनी आयडिया, व्हॉट टाइम दि सीएम इज एक्स्पेक्टेड हियर?’.. समोरच्या डिजिटल पट्टीवरच्या आकडय़ांची जुळणी करताकरता पायलटनं मागे वळून विचारलं, आणि मागच्या सीटवर बसलेला एकजण क्षणभरच गोंधळला. काय उत्तर द्यावं, त्याला बहुधा पटकन सुचलं नसावं. मग त्यानं ठोकून दिलं, ‘एनी मोमेंट!’.. त्या उत्तरानं पायलटचं बहुधा समाधान झालं असावं. पुढच्या कोणत्याही क्षणी हवेत झेप घेण्यासाठी तयार होऊन तो सरसावून सीटवर बसला.. पुढे जवळपास अर्धा तास गेला, आणि मुख्यमंत्री आले. त्या सहा आसनी खाजगी एअर टॅक्सीच्या दरवाजातून झुकून आत येताच त्यांनी सवयीनं हातही जोडले, आणि चेहऱ्यावरची स्मितरेषा न पुसता ते सीटवर बसले. बाजूला मोजकीच तीन माणसं. त्यातला एक, त्यांचा खाजगी सचिव. समोरच्या सीटवर वर्तमानपत्रांचा गठ्ठा पडलेला. पण साहेबांनी त्याकडे पाहिलंच नाही. नांदेडला पोहोचण्याच्या नियोजित वेळेत फारसा फरक पडणार नाही हे लक्षात येताच समाधानानं हसत मुख्यमंत्र्यांनी हलकेच मान हलवून इशारा केला, आणि एअर टॅक्सीनं हवेत झेप घेतली.. काहीसे ऐसपैस बसत बाजूच्या सीटवर बसलेल्या दोघा पत्रकारांकडे पाहून मुख्यमंत्री समाधानाने हसले. सकाळपासूनच, विमानतळाशेजारच्याच एका हॉटेलमध्ये पक्षातील काही नाराज नेत्यांसोबत चर्चा सुरू असते. ती संपवून मुख्यमंत्री विमानतळावर निघाले, ही बातमीही बाहेर टीव्हीवर आणि पत्रकारांच्या व्हॉटसअप ग्रुपवर पडेपर्यंत मुख्यमंत्री विमानात दाखल झालेले असतात.. ‘किरकोळ कुरबुरी असतात.. तुम्हाला माहीतच असेल त्यांची नाराजी काय आहे ते!’.. काहीसं स्वतशीच बोलत आणि गूढ हसत मुख्यमंत्र्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं. विमानानं नांदेडची दिशा कापायला सुरुवात केलेली असते. तेवढय़ात फोन वाजतो. मागच्या सीटवरून साहेबांचा पीए त्यांच्या हातात फोन देतो, आणि सूचना सुरू होतात. कोणत्या कपाटात काय साहित्य ठेवलंय, त्यातलं काय कुणाला द्यायचंय, ते कुठे पाठवायचंय.. साऱ्या सूचना एका दमात देऊन मुख्यमंत्री पुन्हा निवांत होतात..
.. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पायाला जणू भिंगरी लागलीय. वेगवेगळ्या गावांमध्ये बैठका, प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, प्रचाराचं नियोजन, आढावा आणि इतर सर्व व्यवस्था.. महाराष्ट्रात सध्या तरी, काँग्रेसचा प्रचाराचा तंबू पृथ्वीराज चव्हाण या एकखांबी आधारावरच आहे. सारे दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघांत जखडून पडले आहेत. कोकणात नारायण राणे यांनी आपली सारी क्षमता मुलाच्या विजयासाठी पणाला लावली आहे, तर सोलापुरात नरेंद्र मोदींच्या सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेडला अशोक चव्हाणांना स्वतचाच मतदारसंघ पिंजून काढावा लागतोय.. मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी मतदारसंघात यावं, अशी सगळ्याच उमेदवारांची मागणी आहे. मग दररोजच प्रवास, रात्री अपरात्री घरी परतणं, बैठका, चर्चा, नियोजन, उशीरा झोपणं आणि सकाळी लवकर पुन्हा हवेत झेपावणं.. हीच पृथ्वीराज चव्हाणांची दैनंदिनी आहे..
त्या दिवशी, नांदेडला अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात संध्याकाळी जाहीर सभा होती. या सभेत आक्रमकपणानं प्रतिपक्षावर हल्ला होणार हे अपेक्षितच होतं. विमानातून नांदेडला पोहोचेपर्यंतच्या गप्पांमधूनही बहुधा त्याचीच जुळणी मुख्यमंत्री करत असतात. नरेंद्र मोदी आपल्या सभांमधून रेटून खोटी माहिती देत आहेत, आणि त्यांना उत्तर देण्याची गरज आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतं.. संध्याकाळच्या सभेत ते काय बोलणार याचा अंदाज अगोदरच आलेला असतो.. वरपासून खालपर्यंतच्या पक्षांतर्गत कुरबुरी, पंतप्रधान कार्यालयातील जबाबदाऱ्या, राजीव गांधींची पहिली भेट, त्यानंतर झालेला राजकारण प्रवेश, कराडमधील पहिल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातीलच बडय़ा नेत्याकडून झालेला कोंडी करण्याचा प्रयत्न, पंतप्रधान कार्यालय आणि पक्ष नेतृत्व यांच्यात समन्वय साधताना करावी लागलेली कसरत, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रालय सांभाळताना प्रसार माध्यमांशी असलेले संबंध, अशा अनेक विषयांवर बोलताना मुख्यमंत्री काही काळ भूतकाळात जातात.. तोवर विमान नांदेडच्या विमानतळावर पोहोचलेलं असतं.
विमानतळावर अपेक्षेप्रमाणे गर्दी असतेच. सीएमसाहेब झपाझप विमानातून उतरतात.. विमानाबाहेरच एक वाहनही उभे असते. एक हार गळ्यात पडतो, आणि कुणीतरी घाईनं पुढे होऊन सीएमसाहेबांच्या डोक्यावर छत्री धरतो. नांदेडच्या उन्हाचा कडाका तीव्र झालेला असतो. कुणीतरी त्यांना गाडीत बसण्याची विनंती करतो, पण मुख्यमंत्री चालू लागतात.. आपल्या राजकीय प्रवासाच्या सगळ्या नोंदींची विमानात केलेली उजळणी अजूनही त्यांच्या मनात घोळत असते..
‘हे सारं लिहून ठेवायला हवं, असं नेहमी वाटतं.. बघू कधी जमतंय ते!’.. चालताचालता ते बोलून जातात. बाहेर पुन्हा एक स्वागत समारंभ होतो. मोजकेच हार, गुच्छ हाती घेऊन बाजूच्या कर्मचाऱ्याकडे सोपवत मुख्यमंत्री एकेकाशी हलक्या आवाजात बोलत असतात. पाचदहा मिनिटांत बहुधा, मतदारसंघातील वातावरणाची सारी माहिती त्यांच्याकडे जमा झालेली असते. मग गाडय़ांचा ताफा थेट सभेकडे रवाना होतो. मुख्यमंत्री आल्याची वर्दी सभेला देणारे फटाके वाजतात, काही मिनिटं मंचावरचं वातावरण थोडंसं विस्कळीत होतं, आणि नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या शेजारी मुख्यमंत्री बसतात.. सभा पुढे सुरू होते. वक्ता बोलत असतो, आणि मंचावर दोघे चव्हाण परस्परांशी काहीतरी वैचारिक देवाणघेवाण करत असतात. कॅमेऱ्याचे सारे फ्लॅश त्यांच्यावरच झगमगत असतात.. दुसऱ्या दिवशी साऱ्या माध्यमांमध्ये हाच फोटो झळकणार, याची बहुधा दोघांनाही खात्री असते!.  
पृथ्वीराज चव्हाण भाषण संपवतात, आणि ताटकळलेले श्रोते उठू लागतात. ‘तीनच तासांचा करार होता, आता लोकं उठणारच.. अशोक चव्हाणही दिल्लीत गेलेच पाहिजेत. कवा बी, एका म्यानात एकच तलवार हवी!’.. गळ्यात तिरंगी पट्टा लटकावलेला कुणी कार्यकर्ता शेजाऱ्याच्या कानाशी कुजबुजतो.. सभा आटोपते, आणि मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने परभणीला रवाना होतात. ती सभा आटोपून पुन्हा रात्री विमानानं मुंबईला परतायचं असतं. परभणीहून नांदेडपर्यंतच्या परतीच्या प्रवासात गाडीत स्थानिक नेत्यांशी हलक्या गप्पांमध्ये मुख्यमंत्री रमलेले असतात.. स्थानिक राजकारण, राज्यातील निवडणुकीच्या निकालांचा अंदाज, कोण कुठे आहे, कुठली परिस्थिती अवघड आहे, कुणाला अधिक काम करण्याची गरज आहे, पुढच्या काही दिवसांत कुठेकुठे जायचंय, सारी माहिती मुख्यमंत्र्यांच्या तोंडात असते..
नांदेडनंतर परभणीच्या सभेतही भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळालेला असतो. अपेक्षित गर्दीही असतेच. ही सारी गर्दी, आपलं भाषण ऐकण्यासाठी जमलीय, या जाणीवेचं एक हलकंसं प्रतिबिंब परतीच्या प्रवासातही मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं असतं.. गप्पांच्या ओघात कुठल्याशा विषयावरून सोबतचा स्थानिक नेता बोलून जातो, ‘साहेब, आपल्यापेक्षा मोठं आम्हाला कुणीच नाही.. तुम्ही मोठे आहात, म्हणून आम्ही मोठे आहोत.. तुम्ही असंच मोठं असलं पाहिजे बघा..’
पृथ्वीराज चव्हाण मोटारीत पुढच्या सीटवर असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत, पण, समाधानाची ती रेषा अधिकच ठळक झालेली असावी, असं अंदाजानंच ओळखू येतं..