गोपीनाथ मुंडे यांची जागा कोण घेणार, राज्याचे नेतृत्व कोण करणार व मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रश्न केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे श्रेय कोण पटकावणार यावरून भाजपमध्ये प्रदेश नेते आणि खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा कोण आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता कोणाकडे आहे, हे केंद्रीय नेतृत्वासमोर सिध्द करण्यासाठीच या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या काळात ही स्पर्धा लढाईत रुपांतरीत होईल अशी चिन्हे आहेत.
मुंडे यांच्याकडे राज्यातील भाजपचे नेतृत्व होते आणि महायुतीची सत्ता आल्यास भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे ते नैसर्गिक दावेदार होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते आणि महायुतीतील सर्व घटकपक्षांना सांभाळून निवडणुकीत यश मिळविण्याचे गणित त्यांनी लोकसभा निवडणुकीत जमविले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे प्रदेश भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली असून सामूहिक नेतृत्वाद्वारे निर्णयप्रक्रिया राबविण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी जिकीरीची आहे. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही सत्ता येण्याचा विश्वास भाजप नेत्यांना वाटत असून साहजिकच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद यापैकी जे वाटय़ाला येईल, त्या पदासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. सध्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रदेश भाजपचे नेतृत्व आहे.
मुंडे यांच्यानंतर राज्यात सर्वाना सामावून घेणारे नेतृत्व आपलेच असल्याचे या नेत्यांकडून भासविले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी शेतीमालाच्या किमान दरावरून आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी तावडे यांनी स्वतहून पार पाडली आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांबरोबर मंगळवारी बैठक ठरविल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात ही बैठक प्रदेशाध्यक्ष फडणवीसांनी ठरविली होती, असे सूत्रांनी सांगितले. तावडे यांनी रेल्वेदरवाढीविरोधात मुंबईतील खासदारांना दिल्लीत नेऊन रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली व पासातील दरवाढ मागे घेतली गेली. रेल्वे हा खासदार किरीट सोमय्या यांचा ‘कॉपीराईट’ असताना तावडे यांनी चढाई केली आणि शहरात पोस्टर्स लावून रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. कोकण रेल्वेचे गणेशोत्सवातील आरक्षण काही वेळात ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने त्याच्या चौकशीची मागणी तावडे यांनी केली. कृषिमंत्री व रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी तावडे, फडणवीस व अन्य नेते मंगळवारी दिल्लीत जाणार असताना सोमय्या यांनी शिताफीने सोमवारीच हा प्रश्न नवी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांकडे मांडला. त्यांनी प्रसिध्दीमाध्यमांपुढे जोरदारपणे बाजू मांडली. आता भाजप नेत्यांमध्ये श्रेयाची व नेतृत्वाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.