काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी कायम ठेवण्यावरून सध्या धुसफूस सुरू असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.
इच्छुकांनी ११ ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यात अर्ज टिळक भवन येथील मुख्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आघाडी कायम राहण्याबाबत काँग्रेसचे नेते साशंक आहेत.
 पक्षाने गाफिल राहू नये, असा मतप्रवाह गेल्या मंगळवारी झालेल्या राज्यातील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता. आघाडीचा निर्णय दिल्लीच्या पातळीवर घेतला जावा, अशी शिफारस प्रदेश काँग्रेसने केली आहे.  आघाडी कायम ठेवण्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नसल्याने पक्षाने सर्व २८८ मतदारसंघांत निवडणुकीची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
आम्हाला उपदेशाची गरज नाही राष्ट्रवादीला काँग्रेसचे प्रत्युत्तर
केंद्रात आणि राज्यात सर्वाधिक काळ आघाडीच्या सरकारांचे नेतृत्व काँग्रेसने केले आहे. यामुळे आघाडीचे सरकार कसे चालवावे याचा उपदेश आम्हाला करण्याची गरज नाही, असा टोला काँग्रेसने राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांच्या आरोपांवर दिले आहे. आघाडीचे सरकार चालविताना काँग्रेसने मोठय़ा भावाप्रमाणे नेहमीच संयमी आणि सामंजसाची भूमिका बजाविली आहे. याचा अर्थ काँग्रेसला कठोरपणे वागता येत नाही असा समज करून घेऊ नका, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे. आघाडीचा धर्म आम्ही पाळतो, पण कोणीही वाटेल तशी मुक्ताफळे उधळू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.