केंद्रीय रसायने राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांचे नाव बलात्कार प्रकरणात समोर आल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी येथे भाजपच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली.
अखिल भारतीय काँग्रेस महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा ओझा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शक दुपारी भाजपच्या मुख्यालयासमोर जमले आणि त्यांनी भाजपविरोधी घोषणा दिल्या. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटना घडल्या तेव्हा भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. मात्र राजस्थान आणि मध्य प्रदेशात बलात्काराच्या घटना घडल्या तेव्हा भाजपने मौन पाळले. यावरून भाजपचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो, असे ओझा म्हणाल्या.
बलात्काराचे गुन्हे भाजपला किरकोळ वाटत असतील तर महिलांसाठी कोणत्या प्रकारच्या सुरक्षेची भाषा भाजप करीत आहे, महिलांविरुद्धचे गुन्हे सहन केले जाणार नाहीत, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिले आहे. पंतप्रधानांची हीच भूमिका आहे का, असा सवालही काँग्रेसने केला आहे. पीडितेवर दबाव आणला जात असल्याने तिला सुरक्षा द्यावी अशी मागणी केली.