आघाडी धर्माचे पालन राष्ट्रवादीकडून केले जात नाही. गद्दारीचे व पाडापाडीचे राजकारण ते करतात. आधी घर सुधारा, मग आमच्यावर सूचनांचा मारा करा, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर थयथयाट केला. अखेर, सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वळसे यांनी दिली.
शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी वळसे यांनी देवदत्त निकम यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे तसेच त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. या चर्चेत काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यपध्दतीवर आगपाखड केल्याचे सांगण्यात येते. एकत्रित प्रचार करायला व आघाडी धर्म पाळायला आम्ही तयार आहोत. मात्र, राष्ट्रवादीत काय चाललंय, याचा कानोसा घ्या. राष्ट्रवादीचे नेते आघाडी धर्म पाळत नाहीत. मावळात तुमच्याच पक्षात दुटप्पी प्रचार होतो आहे. तुमच्यात ताळमेळ नाही. त्यामुळे आधी घर सुधारा व नंतर आम्हाला सूचना करा, असा काँग्रेसचा सूर होता. केवळ शिरूरपुरता विचार न करता मावळचाही करावा आणि अजितदादांनी तळेगावात जाहीर केलेल्या भूमिकेवर ठाम रहावे, अशी टिप्पणी पानसरे यांनी केली. भोईर म्हणाले, अजितदादांनी शाब्दिक आवाहन न करता पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारावा. सत्ता गेली तरी चालेल, मात्र त्यांनी कठोर भूमिका घ्यावी. अखेर, वळसे यांनी या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिल्यानंतर तक्रारीचा सूर मावळला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नेहरूनगर येथे २४ मार्चला मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले.