केंद्रात सत्तास्थापनेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे महत्त्व वाढावे या उद्देशाने यंदा कोणत्याही परिस्थितीत १० ते १२ जागा निवडून आणायच्याच या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला होता. पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला राज्यात खासदारांचा दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले नव्हते. यंदा दुहेरी आकडा गाठणार, असा ठाम निर्धार पक्षाचे नेते व्यक्त करीत होते. परंतु गतवेळच्या आठच्या तुलनेत निम्मे म्हणजे चारच उमेदवार निवडून आले. राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून आल्या तेवढीच राष्ट्रवादीसाठी समाधानाची बाब ठरली ! २००९ आणि २०१४ मध्ये राष्ट्रवादीने वातावरणनिर्मिती करीत फुगा फुगविला, पण मतदारांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली. राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवायचे हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी वाटचाल सुरू केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र सिंचन घोटाळ्यांपासून विविध घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे जोडली गेली आणि पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत गेला.
काँग्रेसशी आघाडी आणि त्याच वेळी विरोधकांना गोंजारायचे अशा वेळी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याची राष्ट्रवादी नेत्यांची सवय. निवडणूुक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांना न्यायालयाच्या निकालाच्या आधारे क्लिनचिट देण्याचा प्रयत्न शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला. पवार आणि मोदी भेटीच्या वृत्ताने खळबळ माजली. काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या मोदी यांच्याबाबत वेळोवेळी मवाळ भूमिका घेण्यात आली. दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे जाहीर विधान पवार यांनी करून आणखी संभ्रम वाढविला. काँग्रेसबरोबर आघाडी असतानाच मोदी किंवा भाजपबाबत मवाळ भूमिका किंवा उलटसुलट विधाने केली गेल्याने मतदारांमध्ये वेगळा संदेश गेला. राष्ट्रवादीच्या मोदीप्रेमामुळे पक्षाच्या नेत्यांना खुलासे करत बसावे लागले.
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह विविध मंत्र्यांवर आरोप झाले. पक्षाच्या खासदारांचे संख्याबळ वाढविण्याकरिता ज्येष्ठ मंत्र्यांना िरगणात उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. भुजबळ आणि तटकरे या आरोप झालेल्या मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याचा पक्षाचा निर्णय चुकला. दोघांचाही पराभव झाला. राष्ट्रवादीचे काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी वा कार्यकर्र्ते यांच्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, असा एक समज राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये निर्माण झाला. सिंचन, टोल असे विविध प्रश्न गाजत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसामान्यांच्या ऐवजी ठेकेदारांची तळी उचलली. काही गावांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी दहशत निर्माण केली आहे. याचीही प्रतिक्रिया उमटली. छगन भुजबळ, गणेश नाईक, सुनील तटकरे आदी नेत्यांची संस्थानेच मतदारांनी खालसा केली. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले. हे सारेच राष्ट्रवादीसाठी धोक्याचे आहे.
राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असा एक समज आहे. पक्षाच्या स्थापनेचे सुरुवातीचे तीन महिने वगळता राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत भागीदार आहे. यामुळेच राष्ट्रवादीसाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने राष्ट्रवादीला वेगळी व्यूहरचना आखून विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. आघाडी कायम ठेवण्याशिवाय दोन्ही काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेसपेक्षा राज्यात दोन जागा जास्तजिंकल्याने विधानसभेच्या जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असा राष्ट्रवादीचा भर राहू शकतो. स्वत: शरद पवार हे जातीयवादी पक्षांबरोबर हातमिळवणी करण्याच्या विरोधात आहेत. पक्षातील तरुण नेते मात्र सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसबरोबर लढण्याऐवजी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवाव्या, असाही एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पक्षाने पुन्हा एकदा अन्य वादग्रस्त मुद्दे पुढे रेटण्याचे सूचित केले आहे. दुरुस्ती करण्याचा पवार यांचा प्रयत्न राहील.   राष्ट्रवादीसाठी आगामी काळ सोपा नाही हेच स्पष्ट होते.
 सारेच समाजघटक विरोधात
राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विश्वासार्हता हाच मुद्दा २००९ प्रमाणेच यंदाही राष्ट्रवादीला भोवला. एकीकडे मोदी यांची भलामण करीत असतानाच मुस्लिमांना  चुचकारण्याचे प्रयत्न पक्षाकडून झाले. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीनेच राज्यात चर्चेत आणला. मात्र अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळविण्यात राष्ट्रवादीला तेवढे यश मिळालेले दिसत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीने चर्चेत आणल्याने इतर मागासवर्गीयांमध्ये वेगळी भावना तयार झाली. आपल्या आरक्षणावर गदा येण्याची भीती या वर्गात तयार झाली. अल्पसंख्याक, दलित, इतर मागासवर्गीय असे सारेच समाज घटक विरोधात गेले.
४४३ लोकसभेची पहिलीच निवडणूक लढविताना आम आदमी पक्षाने देशात लोकसभेसाठी उभ्या केलेल्या उमेदवारांची संख्या. आपला पंजाबात मिळालेल्या दोन जागा वगळता हाती काही लागले नाही.

या विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार विरोधी आघाडी या नात्याने काम करेल. राज्यातील निकाल पाहता सरकार बरखास्त करण्याची मागणी महायुतीने केली आहे, मात्र ही मागणी योग्य नाही.

दिल्लीतील आम आदमी पक्षाची कामगिरी खंतावणारी आहे. मात्र यातील विरोधाभास म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आम्हाला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आम्हाला विधानसभेत ३० टक्के मते मिळाली होती. तर आता, ३३ टक्के मते मिळाली. हा बदल सकारात्मक होता.

५ राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, उत्तराखंड या राज्यांमधील सर्व जागा भाजपला.

७ दिल्लीत भाजपचे विजयी उमेदवार. येथे मीनाक्षी लेखी यांना ४,५३,३५० मते मिळाली.
२.१  टक्के. देशात आम आदमी पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी. आपला देशात ११२१८४४८ मते मिळाली.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय समाज आघाडीचे महादेव जानकर यांचा ६९७१९ मतांनी पराभव केला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या बारामती व सातारा या दोनच मतदारसंघात यश मिळविणे पक्षास साध्य झाले.

स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ मते मिळाली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार कल्लप्पा आवडे यांचा १ लाख ८७ हजार ८१० मतांनी पराभव केला. स्वाभिमानी पक्ष या निवडणुकीत महायुतीमध्ये सहभागी झाला आहे.

प्रा. साधू सिंग या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पंजाबमधील फरिदकोट मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार परमजीत गुलशन कौर यांचा १ लाख ७२ हजार ५१६ मतांनी पराभव केला आहे. सिंग यांना ४ लाख ५० हजार ७५१ मते मिळाली.

वाराणसी येथून नरेंद्र मोदी यांच्याकडून ३३६८५४ मतांनी पराभूत. मात्र पहिलीच निवडणूक असूनही १ लाख ७९ हजार ७३९ मते केजरीवाल यांना मिळाली. आम आदमी पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती. मात्र दिल्लीत या पक्षास संपूर्ण अपयशाचा सामना करावा लागला.

तेरणा सहकारी साखर कारखाना घोटाळ्यातील ठपका, पवन राजेनिंबाळकर हत्याप्रकरण, उस्मानाबाद जिल्हा बँकेतील घोटाळा अशा प्रकरणामुळे बदनाम झालेल्या पद्मसिंह पाटील यांना प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला आणि तोही तब्बल २,३३,००० मतांनी.

बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा भाजपच्या चिंतामण वनगा यांनी पराभव केला. बळीराम जाधव हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांना २ लाख ९३ हजार २०८ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी वनगा यांना ५ लाख ३२ हजार ९९६ मते मिळाली.