निवडणुकीच्या निकालानंतर देशात १९९६ प्रमाणे स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा देणे काँग्रेसला भाग पडेल, असे मत माकपने व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अभाअद्रमुकसारखे पक्ष तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील, अशी शक्यताही माकपने व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर १९९६ मध्ये देवेगौडा यांनी सरकार स्थापन केले होते.
धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर यावे यासाठी काँग्रेसला भूमिका बजावावी लागण्याची शक्यता असून, हे सर्व निकालांवर अवलंबून आहे. काँग्रेसला भाजप सत्तेवर नको असल्यास त्यांना त्यादृष्टीने भूमिका घ्यावीच लागेल, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे. देशातील अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांची ताकद आहे आणि ते पक्ष सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असेही करात म्हणाले.