जागावाटपावरून तणाव असले तरी राज्यात महायुतीचा जोर तसेच परस्परांची गरज यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निवडणुकीपर्यंत तरी कायम राहण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला लागलेली गळती लक्षात घेता आणखी नेत्यांनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून आघाडी कायम असल्याची ग्वाही राष्ट्रवादीला द्यावी लागली आहे.
आघाडीच्या जागावाटपाच्या संदर्भात चर्चेची पहिली फेरी बुधवारी नवी दिल्लीत पार पडली. नव्या सूत्रानुसार जागावाटप व्हावे, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आघाडीच्या विरोधात विधाने करीत असली तरी केंद्रीय पातळीवर मात्र आघाडीशिवाय लढल्याशिवाय पर्याय नाही, असा मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर आता काँग्रेसचे नेते विचार करणार असले तरी गतवेळच्या तुलनेत १० ते १२ जास्त जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसची १२५ जागा सोडण्याची तयारी असली तरी राष्ट्रवादी १३० पर्यंत ताणण्याची शक्यता आहे.
आघाडीची गरज दोघांनाही आहेच, पण राष्ट्रवादीसाठी आघाडीत राहणे अधिक आवश्यक आहे. माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक छोटेमोठे नेते पक्षाला रामराम करू लागले आहेत. आणखी काही जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी स्वतंत्र चूल मांडल्यास राष्ट्रवादीला आणखी गळती लागू शकते. आघाडी कायम राहणार हे चित्र निर्माण झाल्यास गळती काही प्रमाणात तरी रोखली जाईल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होरा  आहे.
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, संसदेत ट्राय सुधारणा विधेयकाला काँग्रेसचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबा, विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीने दर्शविलेली तयारी या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी भाजपच्या अधिक जवळ जात असल्याची शंका काँग्रेसच्या गोटात व्यक्त केली जात होती. पण काँग्रेसबरोबर आघाडीत लढल्याशिवाय विजयाचे गणित जुळू शकत नाही हे राष्ट्रवादी नेत्यांना ठाऊक आहे. स्वतंत्रपणे लढल्यास सर्व समाजाची मते मिळणे कठीण जाईल. त्यातच मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याने अन्य समाजात राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण आहे. काँग्रेसलाही वातावरण अनुकूल नसल्याने मतांचे विभाजन टाळण्याकरिता काँग्रेसलाही राष्ट्रवादीची मदत लागेलच, असे जाणकारांचे मत आहे.

आघाडीसाठी ठाम – पटेल
राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीच्या विरोधात काहीही मते यापूर्वीच्या काळात व्यक्त केली असली तरी दोन्ही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी आघाडी कायम ठेवून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. आघाडी कायम राहावी ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे केंद्रीय नेतेही आघाडीसाठी अनुकूल असल्याचा दावा पटेल यांनी केला.