News Flash

आघाडीमध्ये बिघाडी नाही – अजित पवार

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. सध्या काँग्रेससोबत जागावाटपाविषयी चर्चा सुरू आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते असून त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल.

| August 5, 2014 02:20 am

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. सध्या काँग्रेससोबत जागावाटपाविषयी चर्चा सुरू आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते असून त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. गेल्या वेळीही जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. यावेळीही तो सुटेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विदर्भातील सिंचन प्रकल्पांना राज्यपालांच्या निर्देशांप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. विदर्भातील सिंचनक्षमता वाढावी, सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावती जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पूर्णा नदीचे दरवाजे अचानक उघडण्यात आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, शेतीचे घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या पुरासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली असून जलसंपदा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अहवालानंतर दोष कुणाचा आहे, हे पाहिले जाईल व त्यानुसार निश्चितपणे कारवाई होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
पूरबाधित गावांमधील नागरिकांना १ महिना मोफत धान्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. एका आठवडय़ात पूरग्रस्तांना मदत दिली जाईल. आपत्तीग्रस्तांना मदत देण्याची सरकारची भूमिका कायम आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. अमरावती महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण सत्ता नाही. इतर पक्षांना सोबत घेऊन चालताना अनेक अडचणी येतात. ज्या ठिकाणी आमची पूर्ण सत्ता आहे त्या ठिकाणी झालेली विकास कामे बघा. अमरावतीतही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास बदल पहायला मिळेल, असे अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यानिमित्त ते सोमवारी येथे आले होते. केंद्रातील वरिष्ठ नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आघाडीविषयी अंतिम निर्णय घेतील. जागावाटपाचे सूत्रही ते ठरवतील. सलग दोन निवडणुकीत ही आघाडी कायम आहे. जागावाटपावरून तिढा निर्माण होतच असतो. गेल्या वेळेप्रमाणचे यावेळही तोडगा निघेल.    – अजित पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2014 2:20 am

Web Title: congress ncp alliance strong say ajit pawar
Next Stories
1 जातीपाती तितुक्या मेळवाव्या!
2 भाजपचे जिल्हानिहाय सर्वेक्षण
3 अटी-शर्तीसह जागा वाटप नाहीच!
Just Now!
X