भ्रष्टाचाराच्या विरोधात सारेच राजकीय पक्ष ओरडत असले व स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवार दिल्याचा दावा करीत असले तरी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तीन भानगडबाजांना मराठवाडय़ातून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच व्यवस्था बदलण्याची भाषा करीत असले तरी त्यांच्याच पक्षाने दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीही यात मागे नाही. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पवनराजे निंबाळकर खून खटल्यात डॉ. पद्मसिंह हे आरोपी असून, त्यांना अटकही झाली होती. खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असलेल्या डॉ. पाटील यांना उमेदवारी देऊ नये, असा पक्षात मतप्रवाह होता. त्यांचे पुत्र राणा जगतसिंह यांना उमेदवारी दिल्यास ते निवडून येतील का, याचा आढावा राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आला होता. पुत्र नव्हे तर डॉ. पाटील हेच निवडून येऊ शकतात, हे लक्षात आल्यावर त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. ‘आमच्या दृष्टीने खासदारांची संख्या वाढविणे महत्त्वाचे आहे. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेता डॉ. पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
‘आदर्श’ घोटाळ्यात अडकलेल्या अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम पक्षाला राज्यात भोगावे लागतील, असा युक्तिवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र निवडून येण्याची क्षमता या मुद्दय़ावर ‘आदर्श’ घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेले माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेले नितीन पाटील यांच्याविरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यांना अटकही झाली होती.
संतांच्या भूमीत..
मराठवाडा ही संतांची आणि रत्नांची भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीत आघाडीने तीन रत्ने उभी केल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांच्यासाठी निवडणूक तेवढी कठीण नसली तरी दोन्ही पाटलांना मात्र कडवे आव्हान आहे.