जागावाटपावरून आघाडीत सुरू असलेली रस्सीखेच अद्याप संपली नसली, तरी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बुधवारी १०, जनपथवर झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून १५ ऑगस्टनंतर त्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४, तर राष्ट्रवादीने ११४ जागा लढवल्या होत्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे चार खासदार जास्त निवडून आल्याने पवार यांनी विधानसभेसाठी वाढीव जागांची मागणी केली आहे. निम्म्या जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. तर कोणत्याही परिस्थितीत वाढीव जागा देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांनीही स्वबळाचे दावे केले होते.  
या पाश्र्वभूमीवर बुधवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकत्रित लढलो तरच भले आहे, अशी भूमिका पवारांनी सोनिया गांधी यांच्याकडे मांडल्याचे समजते.  दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी या बैठकीबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. दरम्यान, आघाडी अतूट राहणार असली तरी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. अर्थात जागावाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.