लोकसभा निवडणुकीचा काँग्रेस उमेदवार पक्षांतर्गत निवडणुकीतून ठरविण्यासाठी निवड झालेल्या वर्धा मतदारसंघास बदलून घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. वर्धा येथे दाखल झालेल्या पक्षनिरीक्षकांनी ९ मार्चला मतदान घेण्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातून केलेली यवतमाळ व औरंगाबादची निवड नव्याने बदलून वर्धा व लातुरात हा प्रयोग करण्याचे ठरले. येथील संभाव्य इच्छुक उमेदवार सागर मेघे व चारुलता टोकस यांनी याविषयी जोरदार आक्षेप केंद्रीय नेतृत्वाकडे नोंदविले. खासदार दत्ता मेघे यांनी पक्षप्रभारी मोहनप्रकाश यांच्याकडे रदबदली केली, पण हा सर्व विरोध श्रेष्ठींनी मोडून काढून दिल्लीहून निवडणूक निरीक्षक म्हणून कुणाल बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बारा नेत्यांचा चमू वर्धा येथे पाठवला आहे. २८ फेब्रुवारीस इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करावयाचे आहेत. शपथपत्र व १० हजार रुपये शुल्कासह सादर होणाऱ्या अर्जासोबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन अनुमोदकांचे समर्थन अनिवार्य आहे. ९ मार्चला आयोजित सभेत मतदानपत्र असलेल्या मतदारांनाच उपस्थित राहता येणार आहे. विजयी इच्छुकाचे नाव मात्र घोषित केले जाणार नाही.