आपल्या पुस्तकातील विधानामुळे सोनिया गांधी यांची दुखरी नस दाबली गेली व त्या अस्वस्थ झाल्या हे त्यांनी दिलेल्या तीव्र प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असे माजी परराष्ट्र मंत्री नटवरसिंग यांनी सांगितले. एनडीटीव्हीवर बोलताना त्यांनी असा दावा केला की, किमान पन्नास काँग्रेसजनांनी आपल्याला सत्य सांगितल्याबद्दल अभिनंदनाचे फोन केले.
श्रीमती गांधी यांनी काल असे सांगितले होते की, आपण स्वत: पुस्तक लिहिणार असून त्यावेळी सर्वाना खऱ्या गोष्टी कळतील.  नटवरसिंग यांच्या आत्मचरित्रात असा दावा करण्यात आला होता की, सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर त्यांना इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासारखाच मृत्यू येईल त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होऊ नये असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता. त्या निर्णयामागे आतला आवाज वगैरे काही कारणे नव्हती.
नटवरसिंग यांनी सांगितले की, श्रीमती गांधी यांनी आपल्या पुस्तकावर जी प्रतिक्रिया दिली आहे ती महत्त्वाची आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर सोनियांनी प्रतिक्रिया दिली नव्हती.
राहुल गांधी यांच्याविषयी नटवरसिंग म्हणतात की, राहुल यांची इच्छाशक्ती मोठी आहे पण पूर्ण वेळ राजकारणी म्हणून काम करण्यासाठी त्याला जी तळमळीची जोड लागते ती त्यांच्याकडे नाही. राहुल हे हुशार राजकारणी नसतील पण माणूस म्हणून कठोर आहेत. ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ या पुस्तकात नटवरसिंग म्हणतात की, सोनिया भारतात आल्या तेव्हापासून त्यांना संशयाने पछाडलेले होते, त्यांना सुरुवातीपासून राजेशाही वागणूक मिळाली. नटवरसिंग हे एकेकाळी गांधी कुटुंबाचे निकटवर्ती होते व त्यांनी २००८ मध्ये काँग्रेस सोडली.
नटवर सिंह यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही या आत्मचरित्रातून हल्लाबोल केला आहे. डॉ. सिंग यांनी १० वष्रे पंतप्रधानपद सांभाळले. मात्र दशकभरात ते स्वत:चा असा ठसा उमटवू शकले नाहीत.
सोनिया-नरसिंह राव वादावरही प्रकाशझोत
आत्मचरित्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडणारे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंह यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि सोनिया गांधी यांच्या वितुष्ट संबंधांवरही आत्मचरित्रातून प्रकाशझोत टाकला आहे. सोनिया गांधी या नेहमी राव यांना दूर ठेवत होत्या. त्या आपल्याशी दुजाभाव का ठेवत आहेत, याबाबत राव यांना नेहमीच आश्चर्य वाटत आले होते, असे नटवर यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. ‘‘सोनिया गांधी यांनीच नरसिंह राव यांना पंतप्रधान केले होते, मात्र त्या नेहमी त्यांच्याशी दुजाभावाने वागत होत्या. सोनिया गांधी यांच्याशी संबंध सुधारावेत, यासाठी राव यांनी १९९४मध्ये मला मध्यस्थी करण्यास सांगितले होते. सोनिया गांधी यांच्या वागणुकीमुळे ते अस्वस्थ होते, त्यामुळे त्यांनी मला सोनिया यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी मी गेलो होतो. मात्र मी घडवून आणू शकलो नाही.