राज्य विभाजनामुळे जनतेची नाराजी ओढवून घेतलेल्या काँग्रेसने सीमांध्रमध्ये काँग्रेसचा संघर्ष सत्तेसाठी नव्हे, तर किमान बऱ्यापैकी जागा मिळाव्यात यासाठी सुरू आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक म्हणजे २०१९ च्या निवडणुकीची तयारी या दृष्टीने काँग्रेस बघत आहे.
सीमांध्रमधील विधानसभेच्या १७५ तसेच लोकसभेच्या २५ जागांसाठी तेलुगू देशम-भाजप आघाडी आणि जगनमोहन यांचा वायएसआर काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांचे पक्षात परतल्यास स्वागत आहे, असे आंध्रचे काँग्रेस प्रभारी दिग्विजय सिंह यांनी सांगितले. किरणकुमार रेड्डी यांनी जय सम्यकांध्र पक्षाची स्थापना केली.  सीमांध्रात काँग्रेस लढतीतही नसल्याचा दावा मात्र त्यांनी फेटाळला. काही नेते पक्षाबाहेर जरूर पडले, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेला नाही हे दिग्विजय यांनी निदर्शनास आणले.
पलम राजू यांच्यासारखे अनेक नेते पुन्हा पक्षात परतले आहेत. ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध होते त्यांनी पक्ष सोडला, अशी टिप्पणी रमेश यांनी केली. काँग्रेस नव्या नेतृत्वाखाली लढत असून, पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने ती तयारी आहे. विभाजनामुळे जनतेत संताप असल्याचे त्यांनी मान्य केले. हैदराबाद केंद्रशासित प्रदेश जाहीर केला असता लोक अधिक समाधानी झाले असते असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस सीमांध्रमध्ये सत्तेत येईल असे म्हणणे धाडसाचे आहे. किमान सन्मानजनक जागा मिळवून, मतांची समाधानकारक टक्केवारी गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
 जयराम रमेश