हरयाणा, पंजाब, आसाम आदी राज्यांमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविल्यानेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात त्याचे परिणाम होऊ नयेत या उद्देशानेच काँग्रेस नेतृत्वाने नारायण राणे यांच्याबाबत काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. राणे यांची ताकद ओळखूनच पक्षाने त्यांना महत्त्व दिले असले तरी कोकणाचा गड राखण्याचे मोठे आव्हान आता राणे यांच्यापुढे राहणार आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेत राणे यांनी मंगळवारी सपशेल माघार घेतली. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षावर परिणाम होऊ नये या उद्देशाने काँग्रेसने राणे यांच्याबाबत काहीसे सौम्य धोरण स्वीकारले. वास्तविक काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या नेत्यांची काही खैर नसते. पण नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या राणे यांच्याबाबत पक्षाने लागोपाठ दुसऱ्यांदा मवाळ धोरण स्वीकारले. लवकरच विधानसभा निवडणूक होत असलेल्या हरयाणामध्ये पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे वा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पंजाबमध्येही काही ज्येष्ठ नेत्यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री तरुण गोगाई यांना बदलण्याकरिता आमदारांच्या एका गटाने बंडाचा पवित्रा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर काही पडझड नको म्हणून नेतृत्वाने काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे सांगण्यात येते.
राणे यांच्यामुळे कोकणात काँग्रेसला ताकद मिळेल, अशी अटकळ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बांधण्यात येत होती. कोकणातील विधानसभेचे ३९ मतदारसंघ असले तरी (आघाडीत काही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला) काँग्रेसचे केवळ तीन आमदार निवडून आले होते. सिंधुदुर्गमध्ये राणे एकमेव निवडून आले. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची पाटी कोरीच राहिली. ठाणे जिल्ह्यात फक्त एक आमदार निवडून आला होता. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या राणे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या पुत्राचा पराभव झाला. राणे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या कुडाळ मतदारसंघात राणे पूत्र २२ हजार मतांनी मागे पडले होते. कुडाळ आणि कणकवली हे जिल्ह्यातील दोन मतदारसंघ काँग्रेसकडे असून, स्वत: राणे आणि त्यांचे पूत्र नितेश हे दोघेही निवडणूक लढविणार असल्याचे राणे यांनीच मंगळवारी सूचित केले. कणकवली मतदारसंघात शिवसेनेला दडी हजारांचीच आघाडी मिळाली होती. स्वत:ची ताकद सिद्ध करण्याकरिता राणे यांना दोन्ही जागा जिंकाव्याच लागतील. तसेच शेजारील रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष घालावे लागणार आहे.
कोकणात यश मिळवून दिले तरच राणे यांचे नेतृत्व सिद्ध होऊ शकेल. लोकसभा किंवा गेल्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्यास राणे यांच्यासाठी तो मोठा फटका असेल. शिवसेनेने राणे यांना राजकीयदृष्टय़ा संपविण्यासाठी कंबर कसली आहे, अशा वेळी राणे यांना मुद्दय़ावरून गुद्दय़ावर न जाता यश मिळवावे लागणार आहे.