पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाचही जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने काँग्रेस या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान देणार आहे.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांमध्ये पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षातर्फे पदवीधर अथवा शिक्षक मतदारसंघांत उमेदवार उभे केले जात नव्हते. यंदा मात्र पाचही मतदारसंघांमध्ये पक्षाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.  नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे सध्या आमदार असून, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता लढण्याचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो.