गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर सणकून टीका करणाऱ्या काँग्रेसपुढे महाराष्ट्रात उमेदवारी वाटपात पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या २७ पैकी किमान एका मतदारसंघात मुस्लीम उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. हा पेच सोडविण्यासाठी ‘जर-तर’च्या समीकरणात अकोला मतदारसंघातून मुस्लीम उमेदवार उभा करण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे.
गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रायगडमधून बॅ. ए. आर. अंतुले यांना उमेदवारी देण्यात आली होती. यंदा मात्र रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यावर, मुस्लीमबहुल मतदारसंघ असलेल्या भिवंडीतून  राज्यसभा सदस्य हुसैन दलवाई यांना उमेदवारी देण्यावर पक्षात चर्चा झाली होती. मात्र दलवाई यांनी नकार दिल्याने ही चर्चा संपूष्टात आली. शिवाय भिवंडीतून मुस्लीम उमेदवार दिल्यास मुस्लीमेतर मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे भिवंडीतून मुस्लीम उमेदवाराची शक्यता मावळली आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती होण्याची शक्यता नसल्याने अकोला मतदारसंघातून मुस्लीम उमेदवार उभा केल्यास सकारात्मक संदेश जाईल, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. जर आंबेडकर यांच्याशी युती झाली नाही, तर अकोल्यातून मुस्लीम उमेदवाराच्या नावावर विचार केला जाईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मात्र २७ पैकी एकाही ठिकाणी मुस्लीम उमेदवार उभा न केल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. धुळे मतदारसंघातून मुस्लीम उमेदवाराच्या नावावर पक्षात चर्चा सुरू होती. परंतु येथून अमरिश पटेल यांना उमेदवारी घोषित झाली आहे.