राष्ट्रवादीने सुरू केलेल्या दबावतंत्राच्या पाश्र्वभूमीवर स्वबळावर सर्व जागा लढवाव्यात, असा सूर काँग्रेसमध्ये उमटला असतानाच आघाडीशिवाय पर्याय नसल्याने जागावाटपासाठी पुढील आठवडय़ात वाटाघाटी सुरू करण्याची भूमिका राष्ट्रवादीने बुधवारी घेतली.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीत कमालीची कटुता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीची अशीच दादागिरी सुरू राहणार असल्यास सर्व २८८ जागा लढवाव्यात, असा सूर उमटला. राष्ट्रवादीच्या एकूणच भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये संशयाची भावना असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या नेत्यांच्या बैठकीत मात्र काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्यावर भर देण्यात आला. जागावाटपाच्या संदर्भात १९ तारखेला नवी दिल्लीत अ‍ॅन्टोनी आणि अहमद पटेल यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर राज्य पातळीवरील नेते जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतील.
राष्ट्रवादीला गरज काँग्रेसची
काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचा सूर उमटला असला तरी राष्ट्रवादीने फार हुशारीने पाऊले टाकली आहेत. आघाडीशिवाय लढल्यास आपले जास्त नुकसान होऊ शकते याचा अंदाज राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आहे. यामुळेच काँग्रेसने स्वबळाचा इशारा दिला असला तरी राष्ट्रवादीने जशास तसे उत्तर न देता सामजंस्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादीच्या राजकारणाचा काँग्रेसला अंदाज  येत नाही. तसेच आताही झाले आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमदेवारी देऊन काँग्रेसला  तोंडघशी पाडले. काँग्रेसचे मोहन जोशी यांनी माघार घ्यावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यावरून काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर राष्ट्रवादीने पुन्हा जागावाटपाच्या चर्चेचा मुहुर्तही जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवर मिठच चोळले आहे.