मध्यमवर्गाच्या खाली असलेल्या ७० कोटी लोकांच्या नव्या वर्गासाठी काँग्रेस राजकारण करू इच्छितो असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या धोरणांमुळे १५ कोटी नागरिक दारिद्रय़रेषेच्या वर आल्याचा दावा राहुल यांनी केला.
राजस्थानमधील देओली येथील जाहीर सभेत राहुल यांनी विकासाचा नारा दिला. नागरिकांना सन्मान देऊन त्यांना शिक्षण आणि नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पक्षाचे प्रयत्न राहतील. तसेच गरिबांना काँग्रेस विसरणार नाही असे आश्वासन दिले. भाजपचे नेते भ्रष्टाचारावर टीका करतात, मात्र त्यांना त्यांची सत्ता असलेल्या राज्यातील भ्रष्टाचार दिसत नाही अशी टीका राहुल यांनी केली. राजस्थानमधील भाजप सरकारने तर भ्रष्टाचारात अव्वल स्थान मिळवले होते. सध्याचे सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत असल्याची टीका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहून त्यांचा पर्दाफाश करावा असे आवाहन राहुल यांनी केले. मोफत औषधे, निवृत्तिवेतन अशा अनेक कल्याणकारी योजना भाजप सरकारने बंद केल्याचा आरोप त्यांनी केला.