मध्येच मोदींना पाठिंबा द्यायचा, मध्येच त्यांना विरोध करायचा अशी तळ्यातमळ्यात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीने मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या निकालांनंतर संभाव्य पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. २००९ मध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेस आत्मसंतुष्ट झाल्याने सरकारची घसरण झाली असा आरोप  राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल केला आहे. काँग्रेसवर टीका करताना मात्र त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळली. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून चांगले काम करीत देशाला दिशा दिल्याचे ते म्हणाले. पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाल्यास ते पूर्णत: चुकीचे ठरेल, असेही पटेल म्हणाले.