तेलुगू देसम पार्टीने सीमांध्रमध्ये, तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विभागणी न झालेल्या आंध्र प्रदेशात काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले.  
भाजप-तेलुगू देसमच्या युतीने सीमांध्रमधील १७५ जागांपैकी १०६ जागा मिळवल्या. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ८८ जागांव्यतिरिक्त १८ जागा युतीला मिळाल्या. वायएसआर काँग्रेसला ६७ जागांवर विजय मिळाला.
आंध्र प्रदेशची निर्मिती झालेल्या ५७ वर्षांतील सुमारे ४० वर्षे राज्यातील सत्तेची सूत्रे आपल्याकडे ठेवणाऱ्या काँग्रेसला या वेळी एकही आमदार निवडून देता आलेला नाही. सीमांध्रमध्ये त्यांना विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळालेले नाही.
स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर येथे काँग्रेसला सत्ता काबीज करता येईल, अशी अपेक्षा होती; परंतु काँग्रेसच्या नेत्यांच्या याही आशा धुळीस मिळाल्या. तेलंगणातील एकूण ११९ जागांपैकी २१ जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले, तर तेलंगणा राष्ट्र समितीला ६३ जागा मिळाल्या.
हातमिळवणीऐवजी टीका
स्वतंत्र तेलंगणासाठी आंदोलन करणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या भूमीवर स्वतंत्र जागा लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पथ्यावर पडला. काँग्रेसला या भूमीतील नागरिकांच्या हिताशी काही देणेघेणे नाही. तेलंगणाची निर्मिती करण्यात खूप उशीर केल्याचा आरोप करूनच राव रिंगणात उतरले होते. अखेर त्यांचा निर्णय योग्य ठरला.