लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाच्या कार्यसमितीची सोमवारी दिल्लीत बैठक होत आहे. पराभवातून धडा शिकून पक्षात संघटनात्मक फेरबदल होणार काय, हा प्रश्न आहे.
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाला जबाबदार धरण्याची हिंमत कुणाचीही नाही. मात्र त्यांचे प्रमुख सल्लागार जयराम रमेश, मोहन गोपाल, मोहन प्रकाश आणि मधुसूदन मिस्त्री यांच्याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. अनेक मंत्र्यांचा पक्ष कार्यकर्त्यांशी संवादाच्या अभावाचा मुद्दाही चर्चेला येऊ शकतो. अनेक मंत्र्यांचा दारुण पराभव झाला. पक्ष आणि कार्यकर्त्यांशी तर या मंत्र्यांचा विसंवाद होताच, शिवाय अरेरावीमुळे याचा परिणाम पक्षाला भोगावा लागला.
पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या वृत्ताचा पक्षाच्या नेत्यांनी इन्कार केला आहे. ५४३ पैकी लोकसभेत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या आहेत.
पराभवानंतर समितीची स्थापना करणे, नंतर त्याबाबत काहीच कृती न करणे ही नेहमीचीच गोष्ट आता टाळावी, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. पराभवाची जबाबदारी काही नेत्यांवर निश्चित करून त्याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी एका नेत्याने केली आहे. आता ठोस कृती व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अनिल शास्त्री यांनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे  अनिल शास्त्री पुत्र आहेत.  राज्यांमध्ये जनाधार असलेले नेते नसल्याने हा पराभव झाल्याची पक्षात भावना आहे. महागाई, भ्रष्टाचार हे मुद्देही विरोधात गेल्याचे पक्षाचे नेते मानतात.
अनेक राज्यांमध्ये भोपळा
राजस्थान, ओडिशा, गुजरात, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, गोवा या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या मोठय़ा राज्यांमध्ये केवळ  प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

पराभवाबाबत गंभीर आत्मपरीक्षण करावे, त्यातून ठोस कृती व्हावी.जुन्या जाणत्या नेत्यांकडे दुर्लक्ष करून संधिसाधू लोकांना उमेदवारी दिली जाते. ते टाळले पाहिजे
-अनिल शास्त्री, काँग्रेस नेते

१६व्या लोकसभेत ४० वर्षांखालील खासदारांची संख्या ७१ आहे.  ५५ वर्षांखालील खासदारांची संख्या २१६ आहे. ५६ ते ७० या वयोगटातील लोकसभा सदस्यांची संख्या २१२ आहे, तर ४१ खासदारांचे वय ७०च्या पुढे आहे.

आम्ही पुनरागमन करू!
 लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही भविष्यात नॅशनल कॉन्फरन्स नव्याने उसळी घेईल.गेली पाच वर्षे आम्ही अतिशय समर्पित भावनेने तुमची सेवा केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे, या निकालातून आम्ही खूप काही शिकलो आहोत.नॅशनल कॉन्फरन्सने नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केली आहे, त्यामुळे या अपयशाने खचून न जाता  जोमाने राजकारणात पुनरागमन करेल.

माकपच्या पॉलिट ब्युरोने दिवसभर निकालानंतरच्या परिस्थितीवर विचारविनिमय केला. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान गडबड आणि हिंसाचार चिंताजनक आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षापुढील आव्हानांचा विचार करण्यासाठी ७ आणि ८ जूनला पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वी ६ तारखेला पॉलिट ब्युरोची बैठक होईल. त्यामध्ये निकालांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय होईल. .
 प्रकाश करात, सरचिटणीस, माकप