नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे निर्माण होणाऱ्या वादांना राजनाथ सिंह यांना सामोरे जावे लागते. एरव्ही राजनाथ सिंह शांत व संयमी नेते मानले जातात. पण हल्ली त्यांचाही पारा लवकर चढतो. आता भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय का ठरतात? उगाचच संसदीय मंडळाचे नाव पुढे करायचे. बरं मोदींना दिल्लीत यायला वेळ आहे(!). मोदी दिल्लीत येत नाहीत तोपर्यंत राजनाथ सिंह हेच भाजपचे दिल्लीतील सर्वेसर्वा. उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्ते राजनाथ सिंह यांच्या अशोका रस्त्यावरील निवासस्थानी धडकतात. गिरिराज सिंह यांनी बेगसरायऐवजी नावडातून उमेदवारी दिली म्हणून सिंह यांचे निवासस्थान गाठले. त्यांना तासभर सुरक्षारक्षकांनी अडवून ठेवले. शेवटी ओरडून ते म्हणाले, मी आलोय हा निरोप तर आत पाठवा. त्यांचा आवाज ऐकून राजनाथ सिंह यांनी त्यांना बोलावून घेतले. शांत केले. नि सांगितले, नरेंद्रभाईंनी निर्णय घेतला होता, तुम्हाल नावडामधून उमेदवारी  देण्याचा. तरी गिरिराज सिंह यांची नाराजी दूर झाली नाही.  शेवटी नरेंद्र मोदींनीच मध्यस्थी केली. फोन करून गिरिराज सिंह यांची समजूत काढल्यावर ते पुन्हा कामाला लागले. इकडे राजनाथ सिंह मात्र वैतागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रत्येक सकाळ अशी नाराजीच्या सुरात उगवते. पण ते तरी काय करणार जिथे अडवाणी, जोशी नाराज होऊ शकतात तिथे गिरिराज सिंह किस खेत कि मूली है..