वाराणसीतून ‘नमो-नमो’ गजर सुरू झाल्यामुळे काँग्रेस दिग्गीनामाचा जप करण्याची शक्यता आहे. कधी अनिल शास्त्री, तर कधी शाहरुख खान यांच्या नावाच्या ‘बातम्या’ येत आहेत. अनिल शास्त्री माजी केंद्रीय मंत्री व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव. वाराणसीचा उमेदवार ठरविण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांनी राहुल गांधींवर सोपवली. राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंहांशी चर्चा केली. अहमदभाई पटेल यांना वाटले आपल्याला डावलले! म्हणून त्यांच्या गोटातून अनिल शास्त्री यांचे नाव पुढे आले. आता बनारस म्हटल्यावर उच्चवर्णीय त्यातही ब्राह्मण उमेदवार असल्यास फायदा होईल, असा आपल्या अहमदभाईंचा समज. पण इथेच तर खरी गोची झाली. दिग्गीराजांनी अहमदभाईंच्या अभ्यासावरच प्रश्नचिन्ह लावले. त्यामुळे अहमदभाई आणखीनच संतापले. अहमदभाईंनी सोनियांना दिग्विजय सिंह हेच कसे मोदींविरुद्ध योग्य उमेदवार आहेत, यासाठी बुधवारी डायरेक्ट फोन लावला. इकडे दिग्विजय सिंहांची झाली की पंचाईत. आता मोदींविरुद्ध उभे राहायचे म्हणजे धर्माध, जातीयवादी, मुस्लीमविरोधी वगैरे शब्दांना ‘महत्त्व’ प्राप्त करून द्यावे लागणार. एकीकडे निवडणूक आयोग, तर दुसरीकडे हिंदुबहुल वाराणसीचे मतदार! आधीच आचारसंहिता असल्याने दिग्विजय सिंह यांना कमी बोलण्याचा सल्ला मॅडमनी दिला आहे. त्यात मोदींविरोधात उभे राहिल्यावर तर काय विचारायला नको. नसती उठाठेव टाळण्यासाठी म्हणे दिग्गिराजांना शांत बसवले. पण अहमदभाईंनी आपले काम व्यवस्थित पार पाडले. तेही तसे गुजरातचेच. नरेंद्रभाईंचे समकालीन. मग एवढं नको करायला?