समाजाचा व्यापक विचार करून ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपापसातील वैरभाव संपवून ही ऊर्जा अन्य विधायक कामांत उपयोगात आणावी, असे आवाहन दिल्ली उच्च न्यायालयाने केले आहे. मात्र आधी त्यांनी माघार घ्यावी, अशा आशयाच्या जुगलबंदीमुळे न्यायालयाचे आवाहन पालथ्या घडय़ावर पाणीच ठरले.
केजरीवाल यांनी गडकरी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी गडकरी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणावर भाष्य करताना न्या. रेवा खेत्रपाल आणि एस. पी. गर्ग यांनी म्हटले की, जनता तुमच्याकडे बघते आहे. या प्रकरणात काहीच दम नाही. तुम्ही सामंजस्याने हे प्रकरण का मिटवू शकत नाही? तुमची ऊर्जा विधायक कामासाठी का वापरत नाही? मात्र न्यायालयाच्या या आवाहनावर केजरीवाल यांचे वकील प्रशांत भूषण यांनी, गडकरी यांनीच प्रथम आमच्या विधानावर न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी हवी तर माघार घ्यावी. परंतु आम्ही आमच्या विधानापासून अथवा गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपांवरून मागे हटणार नाही, असे सांगितल्यानंतर न्यायालयाचे आवाहन एक प्रकारे निष्फळच ठरले. आम्ही केलेल्या आरोपांना आमच्याकडे सबळ पुरावा आहे, असा दावाही प्रशांत भूषण यांनी केला. तर गडकरी यांच्या वकील पिंकी आनंद यांनीही त्यांची भूमिका ठामपणे मांडली. ‘मी, (गडकरी) एक प्रामाणिक राजकारणी आहे. केजरीवाल यांनी माझ्यावर आरोप करून माझी अप्रतिष्ठा केली आहे. वास्तविक केजरीवाल यांच्याशी माझे वैयक्तिक शत्रुत्व नाही. केजरीवाल यांनी आपले आरोप मागे घेतले तर मीसुद्धा खटला मागे घेईन’, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली.